भारताचा दिग्गज यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनीचे करिअर अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे त्याचा पर्याय म्हणून रिषभ पंतकडे पाहिलं जात आहे. पण मागील काही काळापासून त्याच्या खराब प्रदर्शनामुळे मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये केएल राहुलने यष्टीरक्षक म्हणून जबाबदारी सांभाळली आहे, तर संजू सॅमसनच्या रूपात भारतीय संघाजवळ एका चांगल्या यष्टीरक्षकाला घडविण्याची संधी होती. परंतु पंतला जास्त प्राधान्य देण्यात आले.
टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना आपल्या आणि पंतच्या नात्याबद्दल सॅमसनने (Sanju Samson) मोकळेपणाने चर्चा केली आहे. सॅमसनने २०१५ मध्ये झिम्बाब्वेविरुद्धच्या टी२० सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यावेळी अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) संघाचा कर्णधार होता. त्या सामन्यात सॅमसनने सातव्या क्रमांकावर फलंदाजी करत १९ धावा केल्या होत्या.
यानंतर २०१९ ला बांगलादेशविरुद्धच्या ३ टी२०सामान्यांसाठी त्याला निवडण्यात आलं होतं. पण त्याला एकाही सामन्यात अंतिम ११ जणांच्या संघात संधी मिळाली नाही. कारण निवडकर्त्यांनी पंतला (Rishabh Pant) संघात खेळवले होते. त्यामुळे तो फक्त ड्रेसिंग रूममध्ये बसून संघाचा उत्साह वाढवत होता. त्याचबरोबर तो विराट कोहली (Virat Kohli) आणि बाकी अनुभवी खेळाडूंसोबत वेळ घालवत होता.
पंतला बांगलादेशविरुद्धच्या टी२० मालिकेत चांगली कामगिरी करता आली नाही. तसेच, सॅमसनला अंतिम ११ जणांच्या संघातून बाहेर ठेवण्यावरून बरेच वाद झाले. माजी क्रिकेटपटू आणि चाहते यांनी असेही म्हटले होते, की सॅमसनचा वापर फक्त मैदानावरील खेळाडूंना पाणी देण्यासाठी केला गेला. या २५ वर्षीय खेळाडूचे म्हणणे आहे, “मी कधीही असा विचार केला नाही, की संघात स्थान मिळविण्यासाठी पंत बरोबर कोणतीही स्पर्धा नाही.”
सॅमसन पुढे म्हणाला, “माझी जागा किंवा पंतची जागा हे सर्व संघ निवडकर्त्यांवर अवलंबून आहे. मी कधीही पंतबरोबर स्पर्धा करण्याचा विचार केला नाही. आम्ही दोघांनी आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून (Dehli Capitals) सुरुवात केली. आम्ही बरोबर बराच वेळ घालवला आहे. आम्ही चांगले मित्र आहोत. तो अतिशय हुशार खेळाडू आहे. आम्हाला बरोबर खेळायला आवडतं. मी त्याच्याबरोबर बरेच सामने खेळलो आहे.”
“जेव्हा लोक माझ्या आणि पंतच्या स्पर्धेबद्दल बोलतात, तेव्हा मला त्याच्याबरोबर खेळण्याविषयी विचार करायला आवडतं. आम्ही दोघांनी खूप मस्तीही केली आहे. मी त्याच्याबरोबर खेळण्यास उत्सुक आहे,” असेही तो यावेळी म्हणाला.