मुंबई । रविवारी इंडियन प्रीमियर लीग 2020 च्या 9 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने किंग्ज इलेव्हन पंजाबवर चमत्कारीक विजय मिळविला. राजस्थानने पंजाबकडून मिळालेले 224 धावांचे लक्ष्य 19.3 षटकांत 6 गडी गमावून पार केले. राजस्थानच्या विजयाचा नायक संजू सॅमसन ठरला. त्याने 42 चेंडूत 85 धावांची खेळी केली. सॅमसनने त्याच्या खेळीत 7 षटकार आणि 4 चौकार लगावले. या उजव्या हाताच्या या फलंदाजाने शारजाह मैदानावर पंजाबच्या प्रत्येक गोलंदाजचा समाचार घेतला आणि आपल्या संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. संजू सॅमसनला सलग दुसर्या सामन्यात सामनावीर पुरस्कार मिळाला.
संजू सॅमसनने जेव्हा क्रीजवर पाऊल ठेवले तेव्हा राजस्थानने जोस बटलरची महत्त्वपूर्ण विकेट गमावली होती. पण सॅमसन क्रीजवर आला आणि त्याने एका षटकारासह आपले खाते उघडले. संजूच्या या शॉटवरून हे स्पष्ट झाले की आज तो पुन्हा एक धडाकेबाज खेळी करेल. संजू सॅमसनने कर्णधार स्मिथबरोबर अवघ्या 22 चेंडूत अर्धशतकी भागीदारी रचली. त्यानंतर त्याने 8.5 षटकांत संघाची धावसंख्या 100पर्यंत नेली. संजू सॅमसनने 27 चेंडूत 3 षटकार आणि 4 चौकारांच्या मदतीने आपले अर्धशतक पूर्ण केले. संजू सॅमसनने दुसर्या विकेटसाठी स्मिथबरोबर 81 आणि तिसर्या विकेटसाठी राहुल तेवतियाबरोबर 61 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. संजूच्या या दोन भागीदारी राजस्थान रॉयल्सच्या विजयाचे कारण ठरल्या.
संजू सॅमसनने निवड समितीला प्रत्युत्तर दिले
संजू सॅमसनमध्ये प्रतिभेची कमतरता नाही, जगातील प्रत्येक क्रिकेट तज्ज्ञांना हे माहित आहे, पण तरीही त्याला भारतीय संघात संधी मिळत नाही. न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिकेत यावर्षी सॅमसनला भारतीय संघात संधी मिळाली, पण तो त्याआधी बर्याचदा काही सामने खेळून बेंचवर बसून होता.
याबद्दस गौतम गंभीर, शेन वॉर्न यासारख्या खेळाडूंनी देखील आश्चर्य व्यक्त केले की संजू सॅमसनसारखा खेळाडू भारतीय संघात कसा खेळत नाही. मात्र, आयपीएल 2020 मधील त्याच्या दोन डावांमधून संजू सॅमसनने भारतीय निवडकर्त्यांना चोख प्रत्युत्तर दिले.
सामन्यानंतर संजू सॅमसननेही आपल्या मनातील भावना सांगितल्या. सामनावीर पुरस्कार मिळाल्यानंतर संजू सॅमसन म्हणाला की, “माझ्याकडे अजून 10 वर्षे क्रिकेट बाकी आहे. त्यासाठी मी जीव तोडून मेहनत घेत आहे.” संजू सॅमसन भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी किती मेहनत घेत आहे, हे यावरून लक्षात येते.






