भारतीय संघाचा यष्टिरक्षक संजू सॅमसन (Sanju Samson) याने बांगलादेशविरुद्धच्या टी20 मालिकेत शतक झळकावले होते. त्यानंतर त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. मात्र, हे शतक झळकावण्याआधी आपल्यावर मोठा दबाव होता असे त्याने सांगितले आहे. तसेच, प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांच्याशी आपल्याला नजर मिळवायला अवघड जात होते, असा खुलासा देखील त्याने केला.
संजू सॅमसनने एका मुलाखतीत सांगितले की, “लहानपणी मला गौतम गंभीरला प्रभावित करायचे होते. तो एलबी शास्त्री क्रिकेट अकादमीत यायचा. त्यानंतर जेव्हा मी माझे पहिले टी20 आंतरराष्ट्रीय शतक झळकावले, तेव्हा गौतम गंभीर माझ्यासाठी सर्वात आनंदी होता. प्रशिक्षक तुमच्यावर विश्वास ठेवतो आणि तुमच्या पाठीशी उभा असतो तेव्हा तुम्हाला चांगली कामगिरी करून, प्रशिक्षकाने तुमच्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवायचा असतो. मला पहिल्या दोन सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करता आली नाही त्यामुळे मला गंभीरशी नजर मिळवताना त्रास होत होता. मात्र, मी स्वतःला सांगितले की माझी वेळ येईल. त्यानंतर मी शतक ठोकले तेव्हा गंभीर माझ्यासाठी टाळ्या वाजवत होता. हे पाहून मला खूप आनंद झाला.”
बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या दोन टी20 सामन्यांमध्ये सॅमसन अपयशी ठरला तेव्हा त्याला खूप ट्रोल करण्यात आले. मात्र, यानंतर या खेळाडूने अवघ्या 47 चेंडूत 111 धावांची खेळी करत खळबळ उडवून दिली. संजूने या खेळीत 8 षटकार आणि 11 चौकार लगावले. संजूने आपली प्रतिभा सिद्ध केली. आता पुढील महिन्यात होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी20 मालिकेत सॅमसन दिसणार आहे. टीम इंडिया नोव्हेंबरमध्ये दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर चार टी20 सामन्यांची मालिका खेळेल. सॅमसन हा या वर्षी झालेल्या टी20 विश्वचषकात भारतीय संघाचा भाग होता. मात्र, त्याला स्पर्धेत एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. भारत या स्पर्धेत विजेता ठरलेला.
हेही वाचा-
IND vs NZ : शतक झळकावूनही सरफराजला बाकावर बसावे लागणार, राहुलला मिळणार आणखी संधी!
फक्त रिषभ पंतच नाही, तर हे 6 खेळाडू देखील झालेत 99 धावांवर बाद!
कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय सलामीवीरांची यादी (टाॅप-5)