(3 जानेवारी) रोजी विजय हजारे ट्रॉफी 2025-26 मध्ये केरळ आणि झारखंड यांच्यात सामना खेळला गेला. या सामन्यात केरळच्या वतीने संजू सॅमसनने फलंदाजीने धमाका केला. त्याने ईशान किशनच्या नेतृत्वाखालील झारखंडविरुद्ध दमदार शतकी खेळी साकारली. वर्ल्ड कप 2026 पूर्वी संजूने कमाल केली आहे. त्याने आपल्या फलंदाजीच्या जोरावर विरोधकांना मोठा इशारा दिला आहे.
संजू सॅमसन या सामन्यात सुरुवातीपासूनच आक्रमक फलंदाजी करत होता. त्याने आधी अर्धशतक पूर्ण केले आणि त्यानंतर 90 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. मात्र, शतक झळकावल्यानंतर तो खेळपट्टीवर जास्त वेळ टिकू शकला नाही आणि बाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला. तरीही त्याने आपले काम चोख बजावले होते. सॅमसनच्या बॅटमधून या सामन्यात 95 चेंडूत 101 धावांची खेळी निघाली. त्याने आपल्या फलंदाजी दरम्यान 9 चौकार आणि 3 षटकारही ठोकले. विशेष म्हणजे, संजू आणि रोहन कुन्नुमल यांनी पहिल्या विकेटसाठी 212 धावांची भागीदारी केली.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना झारखंडने 50 षटकांत 7 गड्यांच्या मोबदल्यात 311 धावा केल्या होत्या. झारखंडकडून सर्वाधिक धावा कुमार कुशाग्रने केल्या. त्याने 137 चेंडूत 143 धावांची खेळी खेळली. आपल्या खेळीत त्याने 8 चौकारांव्यतिरिक्त 7 षटकारही लगावले. दुसरीकडे, ईशान किशन या सामन्यात फ्लॉप ठरला. त्याने 21 चेंडूत 21 धावांची खेळी केली. केरळने संजू आणि कुन्नुमल यांच्या शतकी खेळीच्या जोरावर हा सामना 42.3 षटकांतच आपल्या नावावर केला. केरळकडून बी. अपराजितने 49 चेंडूत 41 आणि विष्णू विनोदने 33 चेंडूत 40 धावांचे योगदान दिले.






