यूएईमध्ये नुकताच आयपीएल २०२१ स्पर्धेचा थरार पाहायला मिळाला. या स्पर्धेत युवा खेळाडूंचा बोलबाला पाहायला मिळाला होता.अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स हे दोन्ही संघ आमने सामने होते. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स संघाने अप्रतिम कामगिरी करत चौथ्यांदा स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते. आगामी आयपीएल स्पर्धेत मोठे बदल पाहायला मिळणार आहेत. २ नवीन संघ प्रवेश करणार आहेत यासह खेळाडूंचा लिलाव देखील होणार आहे. त्यापूर्वी राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार संजू सॅमसन भलताच चर्चेत आला आहे. काय आहे कारण? चला जाणून घेऊया.
आयपीएल २०२१ स्पर्धेत संजू सॅमसनने राजस्थान रॉयल्स संघाचे नेतृत्व केले होते. परंतु ही जबाबदारी त्याला योग्यरीत्या पार पाडता आली नाही. संघात स्टार खेळाडू असून सुद्धा राजस्थान रॉयल्स संघाला या स्पर्धेच्या प्लेऑफमध्ये प्रवेश करता आला नाही. ज्यामुळे राजस्थान रॉयल्स आणि संजू सॅमसन यांच्यात काही तरी खटकल आहे. अशा चर्चा सुरू व्हायला लागल्या आहेत.
माध्यमांतील वृत्तानुसार,संजू सॅमसन राजस्थान रॉयल्स फ्रँचायजीवर नाराज आहे. ज्यामुळे त्याने राजस्थान रॉयल्स संघाला इंस्टाग्रामवरून देखील अनफॉलो केलं आहे. संजू सॅमसनने कृत्य करून सुद्धा राजस्थान रॉयल्सने याबाबत कुठलीही प्रतिक्रिया दिली नाहीये.
तसेच सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, संजू सॅमसनने असे का केले असावे याबाबत राजस्थान रॉयल्स संघाला काही कल्पना नाहीये. तो राजस्थान रॉयल्स संघाच्या मुख्य खेळाडूंपैकी एक आहे ज्याला राजस्थान रॉयल्स संघ रिटेन करणार आहे. परंतु राजस्थान रॉयल्स संघाला अनफॉलो केल्यानंतर संजू सॅमसनने चेन्नई सुपर किंग्स संघाला फॉलो केलं आहे. त्यामुळे असा अंदाज बांधला जात आहे की, संजू सॅमसन आगामी आयपीएल स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्स संघाचे प्रतिनिधित्व करताना दिसू शकतो. कारण एमएस धोनी निवृत्त झाल्यानंतर संजू सॅमसन यष्टिरक्षक फलंदाजाची भूमिका पार पाडताना दिसून येऊ शकतो.