राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात अबु धाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर आयपीएल २०२१ चा ३६ वा सामना झाला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने राजस्थानला विजयासाठी १५५ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानकडून कर्णधार संजू सॅमसन याने एकाकी झुंज दिली. मात्र तो संघाला हा सामना जिंकून देऊ शकला नाही. दिल्लीने ३३ धावांनी राजस्थानला चितपट केले. या पराभवानंतर संजूला अजून एक झटका बसला आहे.
सामन्यादरम्यान षटकांची गती कमी राखल्यामुळे त्याला दंड ठोठावण्यात आला आहे. त्यातही संजूकडून या हंगामात दुसऱ्यांदा ही चूक झाली आहे. त्यामुळे यंदा त्याची शिक्षाही पूर्वीपेक्षा अधिक मोठी आहे.
आयपीएलच्या आचारसंहितेनुसार, राजस्थानने दुसऱ्यांदा निर्धारित वेळेत २० षटके पूर्ण केली नाहीत. याच कारणास्तव राजस्थानचा कर्णधार संजूवर २४ लाखांचा दंड आकारण्यात आला आहे. त्याच्याव्यतिरिक्त प्लेइंग इलेव्हनमध्ये सहभागी इतर खेळाडूंनाही ६ लाख रुपये किंवा त्यांच्या वैयक्तिक सामना शुल्काच्या २५ टक्के दंड भरावा लागणार आहे.
दुर्दैवाची बाब म्हणजे, नुकत्याच २२ सप्टेंबर रोजी पंजाब किंग्ज विरुद्ध झालेल्या सामन्यात त्याच्याकडून पहिल्यांदा ही चूक घडली होती. त्यावेळी त्याला १२ लाखांचा दंड ठोठावण्यात आला होता. त्यानंतर पुढील म्हणजे दिल्लीविरुद्धच्या सामन्यातच त्याने पुन्हा या चुकीची पुनरावृत्ती केली आहे. अशात आता जर उर्वरित हंगामात अजून एकदा त्याच्यावर षटकांची गती कमी राखल्याची नामुष्की ओढावल्यास त्याला ३० लाखांची शिक्षा सोबतच एका सामन्यातून प्रतिबंधित केले जाऊ शकते.
संजू सॅमसनची ७० धावांची झुंज व्यर्थ
दरम्यान या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना दिल्लीकडून सलामीवीर शिखर धवन आणि पृथ्वी शॉ यांना विशेष कामगिरी करता आली नाही. धवन ८ धावा तर शॉ १० धावा करुन पव्हेलियनला परतला. पुढे श्रेयस अय्यरने मोर्चा सांभाळत सर्वाधिक ४३ धावा केल्या. कर्णधार रिषभ पंतनेही काही आकर्षक फटके खेळत २४ धावा फटकावल्या. तर शेवटी शिमरॉन हेयमायरने षटकार-चौकारांची बरसात करत २८ धावा जोडल्या.
संघातील आघाडीचे फलंदाज माघारी परतल्यानंतर ललित यादव (१४ धावा) आणि आर अश्विन (६ धावा) यांनी नाबाद राहत संघाची धावसंख्या १५४ धावांपर्यंत पोहोचवली.
दिल्लीच्या १५६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानची सुरुवात अतिशय खराब झाली. त्यांनी पावरप्लेमध्येच लियाम लिविंगस्टोन (१ धाव), यशस्वी जयस्वाल (५ धावा) आणि डेविड मिलर (७ धावा) यांच्या विकेट गमावल्या. पुढे महिपाल लोमरोर १९ धावांचे योगदान देत कागिसो रबाडाच्या गोलंदाजीवर आवेश खानच्या हातून झेलबाद झाला.
पुढे कर्णधार संजू सॅमसनने मोर्चा सांभाळत डावाखेत ७० धावा चोपल्या. ५३ चेंडूंचा सामना करताना १ षटकार आणि ८ चौकारांच्या मदतीने त्याने ही खेळी केली. परंतु दुसऱ्या बाजूने इतर फलंदाजांची त्याला साथ मिळाली नाही. त्यामुळे राजस्थानचा संघ २० षटकात १२१ धावाच करू शकला.