भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्धची मालिका जिंकली असली तरी सध्या चर्चा मात्र संजू सॅमसनची (Sanju Samson) सुरू आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत तो पूर्णपणे अपयशी ठरल्याने, आता आगामी टी-20 विश्वचषकात त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळणार की त्याला बेंचवर बसावे लागणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारत आपला विश्वचषकातील पहिला सामना 7 फेब्रुवारीला मुंबईत अमेरिकेविरुद्ध खेळणार आहे. मात्र, त्याआधी 4 फेब्रुवारीला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणारा सराव सामना (Warm-up Match) अत्यंत महत्त्वाचा असेल. या सामन्यात कोणत्या खेळाडूंना संधी दिली जाते, यावरून विश्वचषकाचे चित्र स्पष्ट होईल.
न्यूझीलंडविरुद्धच्या शेवटच्या टी-20 सामन्यात एक महत्त्वाची घटना घडली. संजू सॅमसन यष्टीरक्षक म्हणून मैदानात उतरला होता, पण दुसऱ्या डावात त्याने ग्लोव्हज ईशान किशनकडे (Ishan kishan) सोपवले आणि स्वतः फिल्डिंगला उभा राहिला. तेव्हापासूनच अशा चर्चांना उधाण आले आहे की, आता ईशान किशनच सलामीवीर आणि यष्टीरक्षक म्हणून पहिली पसंती असेल.
ईशान किशनने आपल्या तुफानी फलंदाजीने सर्वांना प्रभावित केले आहे, तर संजू सॅमसनला 5 सामने मिळूनही 50 धावाही पार करता आल्या नाहीत. त्यामुळे आता 4 फेब्रुवारीला होणाऱ्या सराव सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






