भारताचा माजी हॉकी कर्णधार सरदार सिंग काल चर्चेत येणासाठी खास कारण होते. सरदार सिंगचे नाव भारताच्या सर्वोच्च क्रीडा पुरस्कार म्हणजेच राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी पाठवण्यात आले आहे. सरदार सिंगसाठी ही अतीशय अभिमानाची आणि आनंदाची बाब आहे यात कोणतेही दुमत नाही, शिवाय सरदार सिंगला हा पुरस्कार या आधीच मिळायला हवा होता असेही अनेकांचे मत आहे.
पण ही जशी आनंदाची बाब आहे त्याचप्रमाणे या पुरस्काराबरोबर काही अडथळे देखील समोर आले आहेत. सरदार सिंगवर असा एक गंभीर आरोप आहे जो सिद्ध झाला तर हे आनंददायी चित्र पालटू शकेल. सरदर सिंगवर एका इंग्लडच्या महिला हॉकीपटूने लैगिंग अत्याचार केल्याचा गंभीर आरोप केला होता, भारतात आणि युरोप येथील पोलीस ठाण्यात तिने तशी तक्रार देखील नोंदवली आहे. तिने सरदार सिंगवर बलात्कार, शारीरिक छळ असे गुन्हे तब्बल १० देशात नोंदवले आहेत ज्यामध्ये हॉलंड, मलेशिया, स्कॉटलंड, बेलजियम या राष्ट्रांचा समावेश आहे.
सरदार सिंगची या पुरस्कारासाठी शिफारस करण्यापूर्वी स्पोर्ट्स ऑथॉरीटी ऑफ इंडियाची बैठक झाली आणि त्यात असा निर्णय घेण्यात आला की सरदार सिंगची या पुरस्कारासाठी शिफारस करायची पण काही अटी आणि नियमांवर. सरदार सिंगचे हॉकी मधील योगदान विसरून चालणार नाही आणि म्हणून त्याची शिफारस करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे असे ही या बैठकीत ठरवण्यात आले. पण जर वर नमूद केलेले आरोप सिद्ध झाले तर सरदार सिंगला त्याचा खेलत्न पुरस्कार परत करावा लागेल. खेलरत्नच्या नियमावलीनुसार ज्या खेळाडूर गंभीर आरोप सिद्ध होतात त्यांना या पुरस्काराचे मानकरी होता येत नाही. त्यामुळे असे काही घडले तर सरदार सिंगसाठी मात्र मोठी चिंतेची बाब होऊ शकते.
या सर्व बाबी लक्षात घेता एक गोष्ट मात्र नक्की आहे की जर का हे आरोप सिद्ध झाले आणि सरदार सिंगची पुरस्कारासाठी निवड झाली तर त्याला हा सन्मान मिरवता येणार नाही.