भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (बीसीसीआय) मंगळवारी इराणी चषक 2024 साठी मुंबई आणि उर्वरित भारताच्या संघांची घोषणा केली. हे संघ सध्या चर्चेत आहेत, कारण या संघांत बांगलादेशविरुद्ध निवडलेल्या भारतीय संघातील तीन खेळाडूंचा समावेश आहे. याचाच अर्थ, हे 3 खेळाडू बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळणार नाही.
भारत विरुद्ध बांगलादेश दुसरा कसोटी सामना 27 सप्टेंबरपासून कानपूर येथे खेळला जाणार आहे. भारतीय संघाची पहिल्या सामन्यातील कामगिरी पाहता, दुसऱ्या कसोटीच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल होण्याची शक्यता फारच कमी आहे. या कसोटीत 3 खेळाडू खेळणार नाहीत, हे आता निश्चित झालंय.
सरफराज खान, ध्रुव जुरेल आणि यश दयाल अशी या तीन खेळाडूंची नावं आहेत. या तीन खेळाडूंना बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी 15 सदस्यीय संघात सामील करण्यात आलं होतं, परंतु त्यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली नाही. आता त्यांची इराणी कपमध्ये निवड झाल्यामुळे ते दुसऱ्या कसोटीलाही मुकणार आहेत. इराणी कपमध्ये सरफराज खान मुंबई संघाकडून खेळणार आहे. तर ध्रुव जुरेल आणि यश दयाल यांना ‘रेस्ट ऑफ इंडिया’ संघात स्थान मिळालं आहे.
दुसरीकडे, आगामी कसोटी मालिकांसाठी श्रेयस अय्यर, इशान किशन आणि शार्दुल ठाकूर भारतीय संघात पुनरागमन करू शकतात. या तिन्ही खेळाडूंची इराणी कपसाठी निवड झाली आहे. हे खेळाडू या सामन्यात चांगली कामगिरी टीम इंडियामध्ये स्थान मिळवू शकतात.
इराणी चषकाबद्दल बोलायचं झालं तर, हा सामना सध्याचा रणजी विजेता संघ आणि ‘रेस्ट ऑफ इंडिया’ संघामध्ये खेळला जातो. गेल्या वेळी रेस्ट ऑफ इंडियानं सौराष्ट्रला 175 धावांच्या मोठ्या फरकानं पराभूत करून ट्रॉफी जिंकली होती. यंदा रेस्ट ऑफ इंडिया संघासमोर रणजी ट्रॉफी 2023-24 विजेत्या मुंबई संघाचं आव्हान आहे.
हेही वाचा –
कानपूर कसोटीत पुन्हा दिसेल अश्विनचा दरारा, वॉर्न-झहीर सारख्या दिग्गजांचे रेकॉर्ड धोक्यात!
कुलदीपला संधी, सिराज ड्रॉप होणार? बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी भारताची प्लेइंग इलेव्हन कशी असेल?
इराणी चषकासाठी संजू सॅमसनकडे पु्न्हा दुर्लक्ष; या कारणांमुळे संघात स्थान नाही?