पुणे कसोटीच्या पहिल्या डावात 11 धावा, दुसऱ्या डावात 9 धावा अन् वानखेडेवर खातं न उघडताच बाद. शेवटच्या तीन डावांवर नजर टाकून तुम्ही म्हणाल की सरफराज खानला मिळालेल्या संधींचा फायदा उठवण्यात तो अपयशी ठरत आहे. मात्र तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, खरी परिस्थिती वेगळीच आहे.
वास्तविक, भारतीय टीम मॅनेजमेंट या युवा फलंदाजासोबत वेगळा खेळ खेळत आहे. बंगळुरूमध्ये 150 धावांची इनिंग खेळणारा सरफराज जर अपयशी ठरत असेल, तर त्यामागे टीम मॅनेजमेंटचे निर्णय कारणीभूत आहेत. आता तुम्हीही विचार करत असाल की, जर सरफराजच्या बॅटमधून धावा येत नसतील तर यात टीम मॅनेजमेंटचा काय दोष आहे? तर हे आम्ही तुम्हाला सांगतो.
बंगळुरू येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात सरफराजनं दोन्ही डावात चौथ्या क्रमांकावर फलंदाजी केली. कसोटीच्या दुसऱ्या डावातही त्यानं 150 धावांची दमदार खेळी केली. मात्र या शानदार कामगिरीनंतरही पुढच्या कसोटीत सरफराजच्या फलंदाजी क्रमात बदल करण्यात आला.
पुणे कसोटीच्या पहिल्या डावात सरफराज सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आला आणि 11 धावा करून बाद झाला. दुसऱ्या डावात सरफराजला आणखी एक स्थान खाली ढकलण्यात आलं आणि तो चक्क सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आला. या डावात तो 9 धावा करून बाद झाला.
मुंबईचं वानखेडे स्टेडियम हे सरफराज खानचं होम ग्राउंड आहे. हे लक्षात घेऊन तरी त्याला फलंदाजीच्या क्रमवारीत बढती मिळायला हवी होती. या मैदानावर सरफराजच्या बॅटमधून अनेक संस्मरणीय खेळी निघाल्या आहेत. मात्र, भारतीय टीम मॅनेजमेंटनं नेमकं याच्या उलट केलं. सरफराज त्याच्या संधीची वाट पाहत राहिला आणि रवींद्र जडेजाला वरच्या क्रमांकावर बढती देण्यात आली. तो सहा विकेट्स पडल्यानंतर मैदानात आला आणि खातं न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला.
फलंदाजी क्रमवारीत होत असलेल्या सततच्या बदलामुळे सरफराज खानवर देखील दबाव वाढतो आहे. जर त्यानं दुसऱ्या डावात मोठी खेळी केली नाही, तर त्याच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होणं सुरू होईल. मात्र यात पूर्ण चुकी त्याची नसेल, हे मात्र नक्की.
हेही वाचा –
शुबमन गिलनं मोडला पुजाराचा मोठा रेकॉर्ड, रोहित-विराटच्या खास क्लबमध्ये एंट्री
रिषभ पंतचा मोठा धमाका, कसोटी क्रिकेटच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा जगातील पहिलाच खेळाडू!
भारताच्या 38 वर्षीय खेळाडूवर सीएसकेची नजर, मेगा लिलावात लावू शकतात मोठी बोली