मुंबई: स्टार इंडियन खेळाडू जी.साथियानने 2018 च्या आयटीटीएफ वर्ल्ड टूर प्लॅटिनम ऑस्ट्रियन ओपन स्पर्धेत जागतिक क्रमवारीत 16 व्या स्थानी असलेल्या पोर्तुगालच्या मार्कोस फ्रेईटासला नमवित चमक दाखवली.
साथियान हा मुख्य फेरीतील एकमात्र भारतीय खेळाडू आहे. त्याने एलिट प्लॅटिनम स्पर्धेत फ्रेईटासला 4-3 अशा फरकाने पराभूत केले. क्रमवारीत 35 व्या स्थानी असलेल्या या भारतीय खेळाडूला पहिला गेम 4-11 असा गमवावा लागला. यानंतर त्याने आक्रमक खेळ करत 11-9, 11-9 असे गेम जिंकले.
पोर्तुगीजच्या या खेळाडूने पुनरागमन करत पुढच्या दोन गेममध्ये 11-8, 11-6 असा विजय मिळवला.साथियानने पुढचा गेम 11-9 असा जिंकत सामना 3-3 असा बरोबरीत आणला. पण, निर्णायक गेममध्ये 11-7 अशी बाजी मारत विजय मिळवला.पुढच्या फेरीत त्याचा सामना जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेल्या झु झिन शी होणार आहे.