भारतीय बॅडमिंटन स्टार जोडी सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी पुन्हा एकदा कमाल केली आहे. त्यांनी कारकिर्दीत दुसऱ्यांदा फ्रेंच ओपन सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धा जिंकली. विशेष म्हणजे, या दोघांना यावर्षी देशाचा सर्वोच्च क्रीडा सन्मान ‘खेलरत्न’ पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं.
सात्विक आणि चिराग यांनी या संपूर्ण स्पर्धेत दमदार कामगिरी केली. अंतिम सामन्यात त्यांनी तैवानच्या ली जे-हुई यांग आणि यांग पो-ह्वान या जोडीचा 21-11, 21-17 असा सरळ गेममध्ये पराभव केला. सात्विक आणि चिराग यांनी अंतिम सामना केवळ 36 मिनिटांत जिंकला.
भारताच्या या जोडीनं अंतिम फेरीत चमकदार कामगिरी करत एकतर्फी विजय मिळवला. सात्विक आणि चिराग यांनी सामन्यातील पहिला गेम अवघ्या 15 मिनिटांत 21-11 असा जिंकला. मात्र दुसऱ्या गेममध्ये या दोघांना थोडाफार संघर्ष करावा लागला. तैवानच्या जोडीनं दुसऱ्या गेममध्ये दमदार कामगिरी केली. त्यांनी एका क्षणी 11-10 अशी आघाडी घेतली होती. परंतु सात्विक आणि चिरागनं अजिबात हार न मानता आपला खरा खेळ दाखवत शानदार पुनरागमन करत गेम 21-17 असा जिंकला.
सात्विक आणि चिराग यांनी फ्रेंच ओपन स्पर्धा जिंकण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी या जोडीनं 2022 मध्ये या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं होतं. 2019 मध्ये हे दोघे उपविजेते राहिले होते.
सात्विक आणि चिराग यांनी या हंगामाच्या सुरुवातीला मलेशिया ओपनच्या फायनलमध्ये प्रवेश केला होता. मात्र, अंतिम फेरीत त्यांना चीनच्या लियांग वेई केंग आणि वांग चांग यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. यानंतर इंडिया ओपनच्या अंतिम फेरीतही त्यांच्या हाती निराशा झाली. येथे चिराग आणि सात्विक यांना विश्वविजेत्यांविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. यावेळी मात्र सात्विक आणि चिरागनं कोणतीही चूक केली नाही आणि त्यांनी दुसऱ्यांदा फ्रेंच ओपन सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं.
महत्त्वाच्या बातम्या-
मराठमोळ्या क्रिकेटपटूच्या 17 वर्षांच्या कारकिर्दीला अखेर विराम, मैदानावर ‘गार्ड ऑफ ऑनर’ देऊन सन्मान
विराट कोहलीची आरसीबीसोबत 16 वर्ष पूर्ण, एक नजर त्याच्या कारकिर्दीवर
एका वर्षात 2 आयपीएल? T20 ऐवजी T10 फॉरमॅट? बीसीसीआय मोठा बदल घडवण्याच्या तयारीत