आयपीएल 2025 च्या मेगा लिलावाला आता फारसे दिवस उरलेले नाहीत. मेगा लिलाव 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी सौदी अरेबियातील जेद्दाह येथे होणार आहे. या लिलावासाठी एकूण 1574 खेळाडूंनी नोंदणी केली होती, त्यापैकी 574 खेळाडूंना निवडण्यात आलं आहे. आयपीएलनं लिलावासाठी शॉर्टलिस्ट केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली, तेव्हा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. शॉर्टलिस्ट केलेल्या खेळाडूंच्या यादीत अनेक मोठी नावं नाहीत.
इंग्लंडचा झंझावाती वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरला आयपीएल 2025 च्या मेगा लिलावासाठी निवडण्यात आलेलं नाही. ऑस्ट्रेलियाचा स्टार अष्टपैलू कॅमेरून ग्रीनही शॉर्टलिस्टमध्ये नाही. त्याचप्रमाणे भारताचा अमित मिश्रा, इंग्लंडचा जेसन रॉय, ख्रिस वोक्स आणि अमेरिकेचा सौरभ नेत्रावळकर यांना मेगा लिलावासाठी निवडण्यात आलेलं नाही.
(1) जोफ्रा आर्चर – इंग्लंडचा झंझावाती गोलंदाज जोफ्रा आर्चरला दुखापत असूनही मुंबई इंडियन्सनं आयपीएल 2023 च्या लिलावात त्याला विकत घेतलं होतं. आर्चर आयपीएल 2023 मध्ये फक्त पाच सामने खेळू शकला होता. त्यात तो अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू शकला नाही आणि दुखापतीमुळे तो आयपीएल 2024 मध्ये सहभागी होऊ शकला नाही. हा वेगवान गोलंदाज अनेकदा जखमी झाला आहे. यावेळी आर्चरला लिलावासाठी शॉर्टलिस्ट करण्यात आलेलं नाही.
(2) कॅमेरून ग्रीन – ऑस्ट्रेलियाचा स्टार अष्टपैलू कॅमेरून ग्रीनलाही आयपीएल 2025 च्या लिलावासाठी निवडण्यात आलेलं नाही. अहवालांवर विश्वास ठेवला तर, ग्रीन पूर्णपणे तंदुरुस्त नाही आणि म्हणूनच त्याला शॉर्टलिस्ट केलं गेलं नाही. ग्रीनला तंदुरुस्त होण्यासाठी सुमारे 6 महिने लागतील.
(3) अमित मिश्रा – भारताचा अनुभवी लेगस्पिनर अमित मिश्राही यावेळी लिलावात दिसणार नाही. गेल्या मोसमापर्यंत तो लखनऊ सुपर जायंट्सचा भाग होता. परंतु त्याला आयपीएल 2025 च्या लिलावासाठी निवडण्यात आलं नाही.
(4) जेसन रॉय – इंग्लंडचा स्फोटक सलामीवीर जेसन रॉय लिलावात अनेकवेळा विकला गेला, मात्र नंतर त्यानं आपलं नाव मागे घेतलं. यावेळी मेगा लिलावासाठी रॉयला शॉर्टलिस्ट करण्यात आलेलं नाही. बोललं जात आहे की, रॉय जास्त किंमत न मिळाल्यामुळे आयपीएलमध्ये खेळत नव्हता.
(5) सौरभ नेत्रावळकर – 2024 च्या टी20 विश्वचषकापासून भारतीय वंशाच्या सौरभ नेत्रावळकरची सतत चर्चा होत होती. सौरभनं 2024 च्या टी20 विश्वचषकात शानदार गोलंदाजी केली होती. तेव्हा असं मानलं जात होतं की त्याला या लिलावात मोठ्या रकमेत खरेदी केलं जाऊ शकतं, परंतु सौरभला मेगा लिलावासाठी निवडण्यात आलेलं नाही.
(6) ख्रिस वोक्स – इंग्लंडचा स्टार वेगवान गोलंदाज ख्रिस वोक्स देखील आयपीएल 2025 च्या मेगा लिलावात दिसणार नाही. वोक्सला कोणत्याही संघानं शॉर्टलिस्ट केलेलं नाही. असं मानले जातं आहे की, वोक्सनं त्याची मूळ किंमत जास्त ठेवली होती. या कारणास्तव त्याला लिलावासाठी निवडण्यात आलं नाही.
हेही वाचा –
कर्णधार म्हणून सूर्यकुमार यादवचा जलवा कायम, या 4 संघांविरुद्ध टी20 मालिका जिंकली
तिलक वर्माने मोडला विराट कोहलीचा महान विक्रम, 2 शतके झळकावून माजवली खळबळ
IND VS SA; संजू-तिलक वर्मा यांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एक दोन नव्हे तर चक्क इतके विक्रम मोडले