आज (4 मार्च) राजकोट (Rajkot) येथे गुजरात विरुद्ध सौराष्ट्र (Gujrat vs Saurashtra) संघात रणजी ट्रॉफी स्पर्धेतील पहिला उपांत्य सामना पार पडला. हा सामना सौराष्ट्र संघाने 92 धावांनी (Won By 92 Runs) जिंकला. त्याचबरोबर रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला.
सौराष्ट्रच्या या विजयात कर्णधार जयदेव उनादकटने (Jaydev Unadkat) मोलाची कामगिरी करत इतिहास रचला आहे. त्याने गुजरातविरुद्ध उपांत्य सामन्यात 10 विकेट्स घेत रणजी ट्रॉफीच्या एका मोसमात एकूण 65 विकेट्स घेतल्या आहेत. त्यामुळे उनादकटने कर्नाटकच्या डोडा गणेशचा 21 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला आहे. 1988-89 मध्ये गणेशने कर्नाटककडून खेळताना रणजी ट्रॉफीच्या एका मोसमात 62 विकेट्स घेतल्या होत्या.
सौराष्ट्रकडून गुजरातविरुद्ध उनाडकटने दुसऱ्या डावात 56 धावा देत 7 विकेट्स घेतल्या आहेत. त्यामुळे सौराष्ट्रने दिलेल्या 327 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातचा दुसरा डाव 72.2 षटकात 234 धावांवर संपुष्टात आला. यावेळी गुजरातकडून फलंदाजी करताना फलंदाज चिराग गांधीने 139 चेंडूत सर्वाधिक 96 धावा केल्या. यामध्ये 16 चौकारांचा समावेश आहे.
तसेच कर्णधार पार्थिव पटेलने 93 धावा आणि भार्गव मेराईने 14 धावा केल्या. मात्र इतर फलंदाजांनी 2 आकडी धावसंख्याही पार करता आली नाही.
सौराष्ट्रकडून गोलंदाजी करताना उनादकटबरोबरच धर्मेंद्रसिंग जडेजा, चिराग जानी आणि प्रेरक मंकड यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
तत्पूर्वी सौराष्ट्रने दुसऱ्या डावात फलंदाजी करताना 274 धावा केल्या होत्या. परंतु त्यांनी पहिल्या डावात घेतलेल्या 52 धावांच्या आघाडीमुळे गुजरातला 327 धावांचे आव्हान दिले होते. सौराष्ट्रकडून दुसऱ्या डावात अर्पित वसावदाने 230 चेंडूत 139 धावा केल्या. यामध्ये 1 षटकार आणि 16 चौकारांचा समावेश आहे. तर चिराग जानीने 51 आणि चेतन साकरियाने 45 धावांची खेळी केली.
गुजरातकडून गोलंदाजी करताना चिंतन गजाने सर्वाधिक 7 विकेट्स घेतल्या. तर अर्झन नागवसवल्लाने 2 विकेट्स घेतल्या.
त्याआधी सौराष्ट्रकडून शेल्डन जॅक्सनने पहिल्या डावात फलंदाजी करताना शतकी खेळी केली. यावेळी त्याने 204 चेंडूत 103 धावा केल्या. यामध्ये 2 षटकार आणि 15 चौकारांचा समावेश होता. त्याच्या या शतकी खेळीमुळे सौराष्ट्र संघाला 304 धावांची मजल मारता आली होती.
त्यानंतर फलंदाजी करताना गुजरातचा पहिला डाव 252 धावांवर संपुष्टात आला होता. या डावात रुजुल भट्ट (71) आणि चिंतन गजा (61) या खेळाडूंनी 50 पेक्षा जास्त धावांची खेळी केली होती. यावेळी सौराष्ट्रकडून गोलंदाजी करताना उनादकटने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या होत्या.
आता रणजी ट्रॉफीतील अंतिम सामना सौराष्ट्र विरुद्ध बंगाल संघात येत्या 9 मार्चपासून राजकोट येथे सुरु होणार आहे. बंगालने उपांत्य सामन्यात कर्नाटकचा पराभव करत अंतिम सामन्यात प्रवेश केला.
महत्त्वाच्या बातम्या-
–खेळपट्टीवर “रहाणे” कितपत योग्य?
–‘कॅप्टनकूल’ धोनी म्हणतो, चेन्नई सुपर किंग्सने शिकवल्या या गोष्टी
–उद्या होणाऱ्या भारत-इंग्लंड टी२० विश्वचषकाच्या उपांत्य सामन्याबद्दल सर्वकाही…