सौराष्ट्राचा संघ रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात बंगालच्या संघाशी लढत देणार आहे. त्यांनी उपांत्य सामन्यात गुजरातच्या संघाला 92 धावांनी हरवले. सौराष्ट्राचा हा गेल्या आठ मोसमातील चौथा अंतिम सामना आहे. तसेच सौराष्ट सलग दुसऱ्यांदा रणजी ट्रॉफीचा अंतिम सामना खेळणार आहेत. मागीलवर्षीही त्यांनी विदर्भाविरुद्ध रणजी ट्रॉफीचा अंतिम सामना खेळला होता. मात्र त्यांना त्या सामन्यात पराभव स्विकारावा लागला होता.
यावर्षी होणाऱ्या रणजी ट्रॉफीत्या अंतिम सामन्यात सौराष्ट्राकडून खेळण्यासाठी भारतीय संघाचा कसोटीपटू चेतेश्वर पुजारा उपलब्ध आहे. त्यामुळे सौराष्ट्राला मोठे बळ मिळाले आहे. सौराष्ट्राचा संघाचा कर्णधार जयदेव उनाडकट याने याबाबतची पुष्टी केली.
पुजाराबरोबरच रविंद्र जडेजाही सौराष्ट्राकडून देशांतर्गत क्रिकेट खेळतो, पण 12 मार्चपासून दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या वनडे मालिकेत जडेजा खेळणं अपेक्षित आहे. त्यामुळे तो रणजी ट्रॉफीचा अंतिम सामना खेळण्याची शक्यता खूप कमी आहे.
याबाबत उनाडकट म्हणाला “मी आणि पुजारा एकमेकांच्या सतत संपर्कात आहोत. पुजारा सुध्दा सौराष्ट्राकडून खेळण्यासाठी उत्सुक आहे. सध्या तो न्यूझीलंडमधून परत आला आहे. तो सौराष्ट्राकडून खेळण्याचा परिणाम बंगालच्या संघाच्या मानसिकतेवरही होईल. आमचे फलंदाज तो संघात आला की एका वेगळ्याच जोशात खेळतात. त्याच्यामुळे संघावरचा ताण हलका होतो.”
सौराष्ट्रसारखाच, बंगालच्या संघातही अंतिम सामन्यासाठी वृध्दिमान साहाचे आगमन होत आहे. त्यामुळे बंगालचा संघही विश्वासाने मैदानावर उतरेल. बंगालचा हा चौदावा अंतिम सामना आहे.
हा अंतिम सामना ९ – १३ मार्चदरम्यान सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
–टीम इंडियाविरुद्ध फायनल खेळताना ऑस्ट्रेलियाला जाणवणार ‘त्या’ खेळाडूची कमतरता
–सचिन तेंडुलकरचा टीम इंडियाला वर्ल्डकप फायनलआधी खास सल्ला….!