सौरव घोषाल आणि दीपिका पल्लीकल या अव्वल भारतीय स्क्वॉश जोडीने पुन्हा एकदा आपले कौशल्य दाखवले. घोषाल आणि पल्लीकल यांनी राष्ट्रकुल क्रीडा २०२२ मध्ये स्क्वॉशच्या मिश्र दुहेरीत कांस्यपदक जिंकले. या अनुभवी भारतीय जोडीने कांस्यपदकाच्या लढतीत ऑस्ट्रेलियाचा २-० असा पराभव केला. या दोघांचे हे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील सलग दुसरे पदक आहे. बर्मिंघम राष्ट्रकुल स्पर्धेतील स्क्वॉशमधील भारताचे हे दुसरे पदक आहे. यापूर्वी सौरवने पुरुष एकेरीत ऐतिहासिक कांस्यपदक जिंकले होते.
BRONZE 🥉 FOR INDIA 🇮🇳
Dipika Pallikal & Saurav Ghosal wins bronze medal in squash mixed doubles event!#TeamIndia | #Cheer4India | #B2022 | #CWG2022 pic.twitter.com/b2zSzQ8raL
— Doordarshan Sports (@ddsportschannel) August 7, 2022
रविवारी (७ ऑगस्ट) झालेल्या या कांस्यपदकाच्या सामन्यात भारतीय जोडीने एकतर्फी विजय मिळवला. बराच काळ एकत्र खेळणाऱ्या या जोडीने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत ऑस्ट्रेलियाच्या लोबान डोना आणि कॅमेरॉन पीले यांना सामन्यात पुनरागमन करण्याची संधी दिली नाही. सुरुवातीला मिळवलेली पकड त्यांनी आणखीन मजबूत करत ऑस्ट्रेलियन जोडीचा सरळ गेममध्ये ११-८, ११-४ असा पराभव केला. दिपीका पल्लिकल ही भारताचा अनुभवी क्रिकेटपटू दिनेश कार्तिक याची पत्नी आहे. दीपिका आणि सौरव या जोडीने २०१८ गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत रौप्य पदक पटकावले होते.
या उल्लेखनीय यशाबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही भारतीय जोडीचे अभिनंदन केले. राष्ट्रपतींनी ट्विट केले की, “राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत स्क्वॉश मिश्र दुहेरीत कांस्यपदक जिंकल्याबद्दल दीपिका पल्लिकल आणि सौरव घोषाल यांचे अभिनंदन. तुमचे पोडियम फिनिश हे भारतातील स्क्वॉशप्रेमींसाठी प्रेरणादायी आहे. अशा विजयांमुळे आपल्या देशातील खेळांची लोकप्रियता वाढते.’