पुणे: डेक्कन जिमखाना क्लब यांच्या वतीने आयोजित नॅशनल एग कॉर्डीनेशन कमिटी(एनइसीसी)प्रायोजित आयटीएफ, एआयटीए व एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या 18व्या एनइसीसी डेक्कन आयटीएफ 25000डॉलर महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत एकेरीच्याअंतिम फेरीत रशियाच्या व्हॅलेरिया सवयिंख हिने अव्वल मानांकित चीनच्या जिया-जिंग लूचा 3-6, 6-2, 7-6(7)असा पराभव करून विजेतेपद संपादन केले.
डेक्कन जिमखाना टेनिस कोर्ट येथे पार पडलेल्या या स्पर्धेत अतितटीच्या झालेल्या अंतिम फेरीच्या लढतीत रशियाच्या व्हॅलेरिया सवयिंखने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. हा सामना 2तास 25 मिनिटे चालला. सामन्यात पहिल्या सेटमध्ये सुरुवातीला दोन्ही खेळाडूंनी आपापल्या सर्व्हिस राखल्या व 3-3अशी बरोबरी निर्माण झाली. त्यानंतर जिया-जिंग लू हिने आक्रमक खेळ करत सहाव्या व आठव्या गेममध्ये व्हॅलेरियाची सर्व्हिस ब्रेक केली व हा सेट 6-3 असा जिंकून आघाडी घेतली.
सामन्यात पिछाडीवर असलेल्या व्हॅलेरियाने दुसऱ्या सेटमध्ये चतुराईने खेळ करत पहिल्याच गेममध्ये लूची सर्व्हिस भेदली. या सेटमध्ये व्हॅलेरियाने आपले वर्चस्व कायम राखत लूची पाचव्या गेममध्ये पुन्हा एकदा सर्व्हिस ब्रेक केली व स्वतःची सर्व्हिस राखत हा सेट 6-2 असा जिंकून सामन्यातील आपले आव्हान कायम राखले. तिसऱ्या व निर्णायक सेटमध्ये सुरुवातीला व्हॅलेरियानेलूची अकराव्या गेमला तर, जिया-जिंग लू हिने व्हॅलेरियाची बाराव्या गेमला सर्व्हिस रोखली व सामन्यात 6-6अशी बरोबरी निर्माण झाल्यामुळे हा सेट टायब्रेकमध्ये गेला.
टायब्रेकमध्ये 5-1 अशा गुणफरकाने आघाडीवर असलेल्या लूला आपली आघाडी टिकवता आली नाही. याचाच फायदा घेत व्हॅलेरियाने आपली पिछाडी भरून काढत हा सेट 7-6(7)असा जिंकून विजेतेपदावर आपले नाव कोरले. यावेळी व्हॅलेरिया म्हणाली कि, भारतात मी प्रथमच स्पर्धा खेळत असून हे माझे पहिलेच विजेतेपद आहे. तसेच, संयोजकांनी उत्तरमरित्या या स्पर्धेचे आयोजन केले आहे. जिया-जिंग लू हिने उत्तम खेळ केला, पण मिळालेल्या संधीचा फायदा घेतसामन्यात पिछाडीवर असताना देखील मी माझ्या खेळात सातत्य राखले व यामुळेच मी हे विजेतेपद संपादन करू शकले.
स्पर्धेतील विजेत्या खेळाडूला 50 डब्लूटीए गुण व 3919डॉलर अशी पारितोषिक देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण एनइसीसी महाव्यवस्थापक बीएसआर शास्त्री, एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर आणि डेक्कन जिमखाना क्लबचे मानद सचिव व एमएसएलटीएचे उपाध्यक्ष विश्वास लोकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी एमएसएलटीएचे आजीव उपाध्यक्ष आनंद तुळपुळे, स्पर्धेचे संचालक व टेनिस विभागाचे सचिव आश्विन गिरमे, आयटीएफ रेफ्री शितल अय्यर, क्लबच्या फायनान्स विभागाचे सचिव गिरीश इनामदार आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचा सविस्तर निकाल:अंतिम फेरी: एकेरी गट:
व्हॅलेरिया सवयिंख(रशिया)वि.वि.जिया-जिंग लू(चीन)(1)3-6, 6-2, 7-6(7).