---Advertisement---

मनिष पांडेचा सुपर ओव्हरमध्ये विजयी षटकार; कर्नाटकसह हे संघ उपांत्य फेरीत दाखल

On: शुक्रवार, नोव्हेंबर 19, 2021 1:00 AM
---Advertisement---

सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेत गुरुवारी (१८ नोव्हेंबर) उपांत्यपूर्व फेरीचे सामने झाले. आठ संघांमध्ये एकूण चार सामने खेळवले गेले आणि यातील दोन सामने खूप रोमांचक झाले. मनीष पांडेने सुपर ओव्हरमध्ये कर्नाटकला विजय मिळवून दिला. त्याचवेळी संजू सॅमसनच्या केरळ संघाला पराभवाचा सामना करावा लागला.

उपांत्यपूर्व सामना १
तामिळनाडू विरुद्ध केरळ

तामिळनाडूने पहिल्या उपांत्यपूर्व सामन्यात रोमहर्षक विजय मिळवला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना केरळने ४ गड्यांच्या मोबदल्यात १८१ धावा केल्या. केरळचा कर्णधार संजू सॅमसन शून्यावर बाद झाला. मात्र, विष्णू विनोदने २६ चेंडूंत दोन चौकार आणि सात षटकारांच्या मदतीने ६५ धावा केल्या. तामिळनाडूकडून संजय यादवने सर्वाधिक दोन बळी घेतले. प्रत्युत्तरात तमिळनाडूने १९.३ षटकांत ५ गडी गमावून १८७ धावा करत विजय मिळवला. तामिळनाडूकडून साई सुदर्शनने ४६ धावा केल्या. शेवटी, शाहरुखने ९ चेंडूत १९* धावांची धडाकेबाज खेळी खेळली.

उपांत्यपूर्व सामना २.
बंगाल विरुद्ध कर्नाटक

हा उपांत्यपूर्व सामना खूपच जबरदस्त ठरला आणि सुपर ओव्हरमध्ये विजयी संघाचा निर्णय झाला. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना कर्नाटकने ५ गडी गमावून १६० धावा केल्या. संघाकडून करुण नायरने २९ चेंडूत नाबाद ५५ धावांची खेळी केली. प्रत्युत्तरात बंगालचा संघ १०८ धावांवर ६ गडी गमावून अडचणीत सापडला होता. पण ऋत्विक चौधरीने १८ चेंडूत ३६ धावा करत सामना रोमांचक बनवला.
शेवटी, मनीष पांडेने शेवटच्या चेंडूवर आकाश दीपला धावबाद केलेआणि बंगालला ८ गडी गमावून १६० धावाच करता आल्या. अशाप्रकारे सामना सुपर ओव्हरमध्ये पोहोचला. सुपर ओव्हरमध्ये बंगालने प्रथम फलंदाजी करताना केवळ ५ धावा केल्या. प्रत्युत्तरात मनीष पांडेने षटकार ठोकत कर्नाटक संघाला विजय मिळवून दिला.

उपांत्यपूर्व सामना ३.
राजस्थान विरुद्ध विदर्भ

या सामन्यात राजस्थानच्या फलंदाजांची निराशाजनक कामगिरी झाली आणि संघाला २० षटकांत ८ विकेट्स गमावून केवळ ८४ धावा करता आल्या. राजस्थानकडून कमलेश नागरकोटीने सर्वाधिक ३९ धावा केल्या. विदर्भासाठी सर्व गोलंदाजांनी जबरदस्त गोलंदाजी केली. यश ठाकूरने संघाकडून सर्वाधिक दोन बळी घेतले. विदर्भाने ८५ धावांच्या लक्ष्याचा सहज पाठलाग करताना १४.५ षटकांत ९ गडी राखून ८७ धावा केल्या. संघाकडून अथर्व तायडेने नाबाद ४० धावा केल्या.

उपांत्यपूर्व सामना ४
गुजरात विरुद्ध हैदराबाद

या उपांत्यपूर्व सामन्यात हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना ५ विकेट गमावून १५८ धावा केल्या. हैदराबादकडून तिलक वर्माने ५० चेंडूत ७५ धावा केल्या. प्रत्युत्तरात लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरात संघाला ८ गडी गमावून केवळ १२८ धावा करता आल्या आणि संघाला ३० धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. हैदराबादकडून तेलुकुपल्ली रवी तेजाने सर्वाधिक तीन बळी घेतले.

आता सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेत चार संघ उपांत्य फेरीत पोहचले आहेत. पहिला उपांत्य सामना तामिळनाडू विरुद्ध हैदराबाद असा सामना रंगेल तर दुसरा उपांत्य सामना कर्नाटक विरुद्ध विदर्भ असा रंगेल.
२० नोव्हेंबरला हे सामने होणार आहेत. यातील विजयी संघ अंतिम सामन्यात खेळतील. अंतिम सामना २२ नोव्हेंबरला होईल.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---