---Advertisement---

ओदिशा एफसी विजयपथावर परतण्यासाठी सज्ज; एससी ईस्ट बंगालचा करणार सामना

On: रविवार, फेब्रुवारी 6, 2022 11:49 PM
---Advertisement---

गोवा (दिनांक ६ फेब्रुवारी) – इंडियन सुपर लीगच्या ( आयएसएल) उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी आता तळाच्या संघामध्ये चुरस पाहायला मिळत आहे. ओदिशा एफसी आणि एससी ईस्ट बंगाल यांच्यातला सोमवारी होणारा सामनाही असाच असणार आहे.

ईस्ट बंगालने मागच्या लढतीत चेन्नईयन एफसीविरुद्ध दमदार खेळ केला आणि तगड्या संघाला २-२ असे बरोबरीवर समाधान मानण्यास भाग पाडले. १८ वर्षीय लाल्रीनलियाना हॅनाम्टेने भरपाई वेळेत बरोबरीचा गोल केला. त्याआधी डॅरेन सिडोएलने फ्री किकवर गोल करून संघात पुनरागमन करून दिले होते. ईस्ट बंगालचा संघ १५ सामन्यांनंतर १० गुणांसह १०व्या स्थानावर आहे. त्यामुळे त्यांना जर उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम राहायचे असेल, तर प्रत्येक सामना जिंकावा लागणार आहे. त्यांचा खेळ आता उंचावलेला पाहायला मिळतोय.

”चेन्नईयन एफसीविरुद्धच्या लढतीत पूर्वाधाच्या खेळानंतर मी खेळाडूंना दुसऱ्या हाफमध्ये संपूर्ण ताकदीने खेळण्यास सांगितले. त्यांनी मी मोकळेपणाने खेळण्याचा सल्ला दिला आणि त्यांनी विश्वास सार्थ ठरवला,”असे मत मुख्य प्रशिक्षक मारियो रिव्हेरा यांनी व्यक्त केले. रिव्हेरा यांच्या मार्गदर्शनाखाली मागील चार सामन्यांत ईस्ट बंगालला दोन सामने गमवावे लागले, तर एक विजय व एक बरोबरीचा निकाल लागला आहे. ते म्हणाले,”चेन्नईयनविरुद्धच्या सामन्यातील दुसऱ्या हाफमधील खेळ हा आमचा आतापर्यंतचा सर्वोत्तम खेळ होता. ”

ईस्ट बंगालच्या ताफ्यातील डच मध्यरक्षक सिडोएलने ९ सामन्यांत तीन गोल केले आहेत आणि यापैकी दोन गोल हे मागील दोन सामन्यांत आले आहेत . मधल्याफळीतील त्याची कामगिरी उल्लेखनीय झालेली आहे. दरम्यान, ओदिशाला मागील तीन सामन्यांत विजय मिळवता आलेला नाही. मुख्य प्रशिक्षक किनो गार्सिया यांना त्यांचा संघ विजयपथावर परतण्याचा विश्वास आहे. ओदिशाने १४ सान्यांत १८ गुणांसह ८वे स्थान पटकावले आहे.

”अजून आमच्या हातात बरेच सामने आहेत आणि आम्हाला उपांत्य फेरीच्या शर्यतीत राहण्याची संधी आहे. उद्याचा सामना जिंकण्यावरच आमचे संपूर्ण लक्ष केंद्रीत आहे. ईस्ट बंगालचा खेळ हा प्रशिक्षकबदलानंतर बराच बदलला आहे,”असे मत गार्सिया यांनी व्यक्त केले.
उभय संघांमध्ये झालेला मागील सामना हा आयएसएलच्या इतिहासातील सर्वात गोल्सचा सामना ठरला होता. ओदिशाने ६-५ अशा फराकने ईस्ट बंगालवर विजय मिळवला होता.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---