न्यूझीलंडचा माजी अष्टपैलू खेळाडू स्कॉट स्टायरिस यानं भारताचा टी20 कर्णधार सूर्यकुमार यादवबाबत एक असं वक्तव्य केलं, ज्यामुळे चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. स्टायरिसनं सूर्याला कर्णधार बनवण्यावर प्रतिक्रिया दिली आहे. सूर्या जास्त काळ कर्णधार राहणार नाही, असं तो म्हणाला.
‘इंडिया टुडे’शी बोलताना स्टायरिसनं आपलं मत व्यक्त केलं. तो म्हणाला, “सूर्यकुमार यादव टीम इंडियाचा टी20 कर्णधार म्हणून जास्त काळ राहणार नाही. कारण सध्याचा उपकर्णधार शुबमन गिल अजूनही नेतृत्वाचे बारकावे शिकत आहे. सूर्यकुमारला ही जबाबदारी देण्यात आली आणि गिल त्याचा उपकर्णधार आहे. याची सुरुवात श्रीलंकेविरुद्धच्या टी20 मालिकेपासून झाली. शुबमन गिलला नेतृत्व कौशल्य शिकण्यासाठी उपकर्णधार बनवण्यात आलं आहे. तो आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सचा कर्णधार आहे. तो मोठ्या आंतरराष्ट्रीय खेळाडूंचं नेतृत्व करतो. त्यामुळे त्याला कोणतीही अडचण जाणार नाही.”
स्टायरिस पुढे म्हणाला की, “वरिष्ठ खेळाडू निवृत्त झाले आहेत आणि या भूमिकेसाठी हार्दिक पांड्याची निवड करण्यात आलेली नाही. गौतम गंभीरला अद्याप नैसर्गिक नेता मिळालेला नाही, त्यामुळेच सूर्यकुमारला एक-दोन वर्षांसाठी तात्पुरती भूमिका दिली जात आहे. गिलला येत्या काही वर्षांत भारतीय संघाचं कर्णधारपद देण्यात येईल. तसेच त्याला त्याच्या खेळावरही काम करावं लागेल. त्यानं गेल्या वर्षीपासून चांगली कामगिरी केली आहे. मात्र आता सातत्याची आवश्यकता आहे. आता त्यानं संघाचं नेतृत्व करण्यास शिकावं अशी निवडकर्त्यांची इच्छा आहे.”
भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी20 मालिकेत सूर्यकुमार यादव भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे. भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध तीन सामन्यांची टी20 मालिका खेळणार आहे. दुसरीकडे, असंही वृत्त आहे की, आगामी काळात बुमराहच्या जागी गिलला कसोटीतही उपकर्णधार बनवलं जाऊ शकते. सध्या रोहित भारतीय संघाचा कर्णधार आहे आणि बुमराह कसोटीत उपकर्णधार आहे. गिलला वनडेतही उपकर्णधार बनवण्यात आलं आहे.
हेही वाचा –
रोहित शर्माचा विसरभोळेपणा, सामानाच्या बॅगा किती आणल्या हेच विसरला!; VIDEO व्हायरल
हार्दिक पांड्या इतिहास रचण्याच्या जवळ! अशी कामगिरी करणारा बनेल पहिलाच भारतीय
केएल राहुलचा राऊडी अंदाज! श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेपूर्वी उडवलं ‘फायटर प्लेन’; VIDEO व्हायरल