सावरकर नगर, गंगापूर रोड येथील रचना अकादमीच्या बॅडमिंटन कोर्टवर 15 आणि 16 डिसेंबर दरम्यान व्हेटरन गटाच्या खेळाडूंसाठीच्या (वयोगट 35+) या स्पर्धेचे सलग दुसऱ्या वर्षी आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेचे उद्घाटन सकाळी 9 वाजता आयर्नमॅन तथा नाशिकचे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी रचना ट्रस्टचे अर्चिज नेर्लेकर, निवेक क्लबचे जॉली, सर्व सहा संघांचे मालक, स्पर्धेचे संयोजक, खेळाडू उपस्थित होते.
पहिल्या सत्रात झालेल्या हॉटशॉट विरुद्ध निवेक मास्टर्स या सामन्यात निवेकने पहिला सामना जिंकला. मात्र हॉटशॉटच्या खेळाडूंच्या आक्रमक पवित्र्यामुळे पुढील चारही सामने गमवावे लागल्याने निवेकला अखेरचा सामना ट्रम्प गुणासह जिंकूनही एकूणच सामना गमवावा लागला. तर डॉल्फिन शटलर्सने नाशिक सुपर जायंट्सचा 5-2 अशा गुण फरकाने पराभव केला. तर नाशिक सुपर किंग्ज विरुद्ध मराठा वॉरियर्सने चुरशीच्या झालेल्या सामन्यात 5-4 असा पराभव केला. पुढील अनेक सामने चुरशीचे झाल्याने पहिल्या दिवसाचा खेळ अंतिम टप्प्यात असताना तब्बल 4 संघ समान गुण संख्येसह गुणतक्त्यात वरचे स्थान मिळवण्यासाठी लढत होते.
स्पर्धा लीग पद्धतीने खेळली जात असल्याने प्रत्येक संघाला प्रत्येक प्रतिस्पर्ध्याशी समान करावा लागणार आहे. स्पर्धेचा दुसऱ्या दिवसाचा खेळ सहा सत्रात होणार असून शेवटच्या सत्रात अंतिम सामना होईल.
पहिल्या दिवशीच्या पाच सत्रातील सामन्यांनंतरचा गुण तक्ता
1. हॉटशॉट : 10 गुण
2. सुपर जायंट्स : 07 गुण
3. मराठा वॉरिअर्स : 07 गुण
4. नाशिक सुपर किंग्ज : 07 गुण
5. डॉल्फिन शटलर्स : 07 गुण
6. निवेक मास्टर्स : 06 गुण