पुणे – महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या(एमसीए) वतीने आयोजित महाराष्ट्र प्रीमियर लीग(एमपीएल) २०२४ स्पर्धेत तिसऱ्या दिवशी पहिल्या लढतीत अझीम काझी(३-११), सत्यजीत बच्छाव(३-१४), दिव्यांग हिंगणेकर(२-१४), योगेश चव्हाण(२-१९) यांनी केलेल्या सुरेख गोलंदाजीच्या जोरावर रत्नागिरी जेट्स संघाने रायगड रॉयल्स संघाचा ७ गडी राखून पराभव करत आपली विजयी मालिका कायम राखली.
गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या आंतरराष्ट्रीय मैदानावर सुरु झालेल्या या स्पर्धेत रत्नागिरी जेट्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रत्नागिरी जेट्सकडून अझीम काझी ३-११, सत्यजीत बच्छाव ३-१४, दिव्यांग हिंगणेकर २-१४, योगेश चव्हाण २-१९) यांनी सुरेख गोलंदाजी करत रायगड रॉयल्स संघाला १८.१ षटकात सर्वबाद १०२धावावर रोखले. सलामवीर विशांत मोरे(०)ला दिव्यांग हिंगणेकरने स्वतःच्या च गोलंदाजीवर झेल बाद करून संघाला पहिला धक्का दिला. त्यानंतर सिद्धेश वीर(१५धावा)ला दिव्यांगने चौथ्या षटकात झेल बाद करून संघाला दुसरा धक्का दिला. २बाद ३० अशी बिकट स्थिती असताना मेहुल पटेल(२४धावा) व रोहन मारवाह(१८धावा)यांनी संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, डावखुरा फिरकीपटू सत्यजित बच्छावने झेल बाद करून रायगडच्या धावगतीला ब्रेक लावला. त्यानंतर विकी ओस्तवालच्या १७ धावा वगळता तळातील सर्व फलंदाज धावा करण्यात यशस्वी ठरले.
१०२ धावांचे आव्हान रत्नागिरी जेट्स संघाने १३षटकात ३बाद १०६धावा करून पूर्ण केले. धावांचा पाठलाग करताना धीरज फटांगरे ४ धावांवर तंबूत परतला. त्याला निखिल कदमने झेल बाद केले. त्यानंतर प्रीतम पाटीलने आक्रमक खेळी करताना १६चेंडूत ३३धावा चोपल्या. यात ३षटकार व ३ चौकारांचा समावेश होता. प्रीतम व अभिषेक पवार(१९धावा) या जोडीने २८ चेंडूत ४८ धावांची भागीदारी करून सामन्यावर आपली पकड भक्कम केली. मनोज इंगळेने प्रीतम पाटील व अभिषेक पवार यांना बाद केले. पण कर्णधार अझीम काझीने २५ चेंडूत २चौकार व १षटकारासह नाबाद २८ धावांची संयमी खेळी केली. त्याला दिव्यांग हिंगणेकरने नाबाद २० धावा काढून साथ दिली. या जोडीने चौथ्या गड्यासाठी ३२ चेंडूत ४३ धावांची भागीदारी करून संघाचा विजय सुकर केला.
संक्षिप्त धावफलक:
रायगड रॉयल्स: १८.१ षटकात सर्वबाद १०२धावा(मेहुल पटेल २४, रोहन मारवाह १८, विकी ओस्तवाल १७, सिद्धेश वीर १५, अझीम काझी ३-११, सत्यजीत बच्छाव ३-१४, दिव्यांग हिंगणेकर २-१४, योगेश चव्हाण २-१९) पराभुत वि.रत्नागिरी जेट्स: १३षटकात ३बाद १०६धावा(प्रीतम पाटील ३३(१६,३x४,३x६),अझीम काझी नाबाद २८(२५,२x४,१x६), दिव्यांग हिंगणेकर नाबाद २०(१६,२x४,१x६), मनोज इंगळे २-१६, निखिल कदम १-२७);सामनावीर – अझीम काझी.