चंदिगढ: ज्या मैदानावर एकेवेळी युवराज सिंग, कपिल देव, हरभजन सिंग यांसारख्या दिग्गजांनी एकेकाळी सराव केला किंवा ट्रेनिंग घेतले ते चंढिगड स्टेडियम २५ ऑगस्ट रोजी जेल होणार आहे.
डेरा सच्चा सौदाचे प्रचारक गुरमीत राम रहीम सिंग यांच्यावर सुरु असलेल्या बलात्काराच्या केसचा निकाल चंदिगढ येथील न्यायालयात दिला जाणार आहे. त्यामुळे त्यांचे अनुयायी मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी येण्याची शक्यता आहे. त्यामुळेच या मैदानाला तात्पुरते जेल बनविण्यात येणार आहे.
अनुयायी मोठ्या प्रमाणावर येण्याचा पोलिसांना अंदाज:
हे मैदान १५.३२ एकरवर पसरले असून त्यात अंदाजे २०,००० लोक या मैदानात थांबू शकतात. यावेळी या शहरात १० लाख डेरा अनुयायी येण्याची शक्यता आहे. याबरोबर येथील काही शाळा, त्यांची मैदाने यांच्यावरही डेराच्या अनुयायांची सोया करण्यात आली आहे .
काय आहे या मैदानाचा इतिहास:
या मैदानावर आजपर्यंत एक कसोटी आणि ५ एकदिवसीय सामने खेळवले गेले आहे. शेवटचा सामना येथे २००७ साली खेळवला गेला आहे. १९९२-९३ साली या मैदानावर पहिला एकदिवसीय सामना झाला होता. या मैदानात तीन विश्वविजेते खेळाडू घडले आहेत.
भारताचे माजी कर्णधार कपिल देव तरुणपणी याठिकाणी क्रिकेट खेळायला येत असत. अनेक वेळा त्यांच्यासोबत त्यांचे जवळचे मित्र योगराज सिंगसुद्धा या ठिकाणी सराव करत असत. अन्य खेळाडूंमध्ये चेतन चौहान, युवराज सिंग, दिनेश मोंगिया, हरभजन सिंग हे खेळाडू या मैदानावर खेळले आहेत. युवराज आणि हरभजन सिंग यांच्या मैत्रीची सुरुवात देखील याच मैदानावर झाली आहे.