इंडियन प्रीमियर लीग २०२१ मध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करूनही रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा वेगवान गोलंदाज हर्षल पटेलला टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघात स्थान मिळाले नाही. मात्र, यामुळे तो निराश झालेला नाही. हर्षल म्हणाला की, निवड त्याच्या हातात नाही.
तो म्हणाला, “मला कधीच पश्चात्ताप झाला नाही. मी माझ्या आयुष्यातील वेळेनुसार माझ्या बाजूने सर्वोत्तम निर्णय घेण्याचा प्रयत्न केला आहे. जोपर्यंत निवडीचा प्रश्न आहे, ते माझ्या हातात नाही.” तो पुढे म्हणाला, “मी क्लब संघ किंवा आयपीएल संघ किंवा देश किंवा हरियाणासाठी खेळतो. मला फलंदाजीत आणि गोलंदाजीत चांगले योगदान द्यायचे आहे. माझे हेच ध्येय आहे आणि जोपर्यंत मी क्रिकेट खेळत आहे, तोपर्यंत हेच ध्येय राहील.”
मुंबई इंडियन्सविरुद्ध हॅट्रिक घेणारा हर्षल म्हणाला, “मी माझ्या आयुष्यातील पहिली हॅट्रिक घेतली आहे. शाळेतही मी कधी हॅट्रिक घेतली नव्हती. मी आयपीएलमध्ये सहाव्यांदा हॅट्रिकजवळ पोहोचलो होतो आणि पहिल्यांदाच यशस्वी झालो. मला यावर विश्वास ठेवण्यासाठी वेळ लागेल. मला कसे वाटत आहे याचे वर्णन मी करू शकत नाही. मी खूप आनंदात आहे.”
That's a HAT-TRICK for @HarshalPatel23 💥💥💥
Live – https://t.co/KkzfsLzXUZ #RCBvMI #VIVOIPL pic.twitter.com/qR9viXLfLb
— IndianPremierLeague (@IPL) September 26, 2021
तो पुढे म्हणाला, “माझ्या क्षमतेनुसार सर्वोत्तम कामगिरी करण्यात मला आनंद होत आहे. संघाबद्दल बोलायचं झालं, तर आम्ही गुणतालिकेचा विचार केला नाही. कारण तसे केल्याने आपण आपल्या ध्येयापासून विचलित होतो. दोन पराभवानंतर अशाप्रकारे स्पर्धेत परत येणे आमच्यासाठी आवश्यक होते. आम्हाला या प्रकारचा खेळ सतत दाखवायचा आहे.
हर्षलने मुंबईच्या आक्रमक अष्टपैलू कायरन पोलार्डच्या विकेटचे वर्णन अतिशय समाधानकारक असे केले. तो म्हणाला, “आम्ही संघाच्या मीटिंगमध्ये देखील याबाबत बोललो होतो, की पोलार्डसारखा फलंदाज बाहेर जाणारा चेंडू सोडणार नाही, पण यॉर्कर टाकल्यास तो चुकू शकतो. मी त्याला हुलकावणी देण्याचा प्रयत्न केला आणि यशस्वी झालो.
हर्षल पटेल हा आयपीएलच्या इतिहासातील १७ वा खेळाडू आहे, ज्याने हॅट्रिक घेतली आहे. याशिवाय तो आरसीबीचा तिसरा गोलंदाज आहे, ज्याने हॅट्रिक नोंदवली आहे. हर्षलने हार्दिक पांड्या, पोलार्ड आणि राहुल चाहरला बाद करत आपली हॅट्रिक पूर्ण केली. पटेल या हंगामात हॅट्रिक घेणारा पहिला गोलंदाज ठरला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-‘या’ खेळाडूची लागली ‘लॉटरी’, टी-२० विश्वचषकात घेणार हार्दिक पंड्याची जागा?
-मुंबई इंडियन्सचे ग्रह फिरले, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्धच्या दारुण पराभवानंतर गुणतालिकेत ‘मोठा’ धक्का
-हॅट्रिक पूर्ण करताच हर्षल मैदानावर सुसाट धावत सुटला, आरसीबीचा ‘विजयी क्षण’ एकदा पाहाच