नुकत्याच झालेल्या दुलीप ट्रॉफीमध्ये अनेक नवीन स्टार्स उदयास आले. यामध्ये अभिमन्यू ईश्वरनच्या नावाचा प्रामुख्यानं समावेश आहे. ईश्वरननं स्पर्धेत इंडिया बी साठी कर्णधार म्हणून चमकदार कामगिरी केली. त्याच्याबाबत भारताचे दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. आगामी ऑस्ट्रेलिया दौरा लक्षात घेता भारतीय निवडकर्त्यांनी ईश्वरनच्या कामगिरीकडे दुर्लक्ष करू नये, असं ते म्हणाले.
सुनील गावस्कर यांचं मत आहे की, भारतीय निवड समितीनं ऑस्ट्रेलियात शॉर्ट बॉलचा सामना करण्यास सक्षम असलेल्या आघाडीच्या फळीतील फलंदाजांला घेऊन जावं. सुनील गावस्कर यांनी त्यांच्या स्तंभात लिहिलं, “दुलीप ट्रॉफीमध्ये अभिमन्यू ईश्वरननं झळकावलेल्या दोन शतकांकडे दुर्लक्ष करता कामा नये. ऑस्ट्रेलियात भारताला शॉर्ट बॉल खेळण्यास सक्षम फलंदाजांची गरज आहे. या दौऱ्यात भारतीय संघानं अधिकच्या सलामीवीर फलंदाजांसह जाणं फायद्याचं ठरेल, जो फक्त टॉप ऑर्डरमध्येच नाही तर मधल्या फळीतही फलंदाजी करू शकतो.”
वास्तविक, अभिमन्यू ईश्वरननं नुकत्याच झालेल्या दुलीप ट्रॉफीमध्ये इंडिया बी संघाचं नेतृत्व केलं होतं. एक सलामीवीर म्हणून त्यानं स्पर्धेत 77.25 च्या जबरदस्त सरासरीनं 309 धावा केल्या. स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो दुसऱ्या स्थानावर होता. अभिमन्यूनं तिसऱ्या सामन्यात इंडिया डी विरुद्ध 116 धावांची शानदार खेळी केली. याआधी त्यानं दुसऱ्या सामन्यात इंडिया सी विरुद्ध 157 धावा ठोकल्या होत्या.
या कामगिरीमुळे ईश्वरनबाबत सध्या बरीच चर्चा होत आहे. त्याची बॅकअप सलामीवीर म्हणून निवड करण्याच्या सूचनाही केल्या जात आहेत. गेल्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर त्याचा बदली खेळाडू म्हणून समावेश करण्यात आला होता. परंतु त्याला पदार्पणाची संधी मिळाली नाही. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 5 सामन्यांची बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिका 22 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. उभय संघांमधील पहिली कसोटी पर्थ येथे खेळली जाईल.
हेही वाचा –
आयपीएल मेगा लिलावापूर्वी किती खेळाडूंना रिटेन करता येणार? मोठं अपडेट समोर
टीम इंडियाचा दणका! वनडे मालिकेत ऑस्ट्रेलिया क्लीन स्वीप
विराट कोहली विरुद्ध जो रुट वादात युवराज सिंगची उडी! सांगितलं कोणता खेळाडू सर्वोत्तम