ला लिगामध्ये आघाडीवर असणारा बार्सेलोना संघ आज मध्यरात्री गिरोना या संघाशी भिडणार आहे. या सामन्यासाठी बार्सेलोना संघात काही बदल आहेत. मागील सामन्यात इबार संघाविरुद्ध बार्सेलोना संघाने ६-१ असा मोठा विजय मिळवला होता. त्या संघातील काही खेळाडूंना या सामन्यात विश्रांती दिली गेली आहे.
बार्सेलोना संघाचे प्रशिक्षक एर्नस्टो वेल्वर्द यांनी उद्या होणाऱ्या सामन्यासाठीच्या संघाची घोषणा केली. त्यांनी १८ खेळाडूंच्या नावांची घोषणा करताना या खेळाडूंमधून मुख्य संघ निवडला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. या १८ सदस्यीय संघात काही खेळाडूंना स्थान नसल्याने निवड प्रक्रियेवर चर्चा रंगली आहे.
मागील सामन्यात उत्तम कामगिरी करणारा गेरार्ड डयूलोफेयू आणि नेल्सन सेमेडो यांना संघात स्थान देण्यात आलेले नाही. डेम्बले हा दुखापतग्रस्त असल्याने गेरार्ड डययूलोफेयू याची निवड निश्चित मानली जात होती. मागील सामन्यातील त्याची कामगिरी पाहता तो त्याला सामन्यात नक्की महत्वाचा खेळाडू म्हणून खेळलेअशी चिन्हे होती. परंतु बार्सेलोना प्रशिक्षक यांनी काही इतर खेळाडूंना संधी देण्याचा निर्णय घेतला आहे.
या सामन्यात आरडा टुरान, सॅम्युएल उटीटी, पॅको अल्कासार, आंद्रे गोमेज या खेळाडूंना संधी देण्याच्याच्या विचारात आहे. या खेळाडूंना इबार विरुद्धच्या सामन्यात संधी दिली गेली नव्हती. हे सारे बार्सेलोना संघातील मोठे खेळाडू आहेत जे इबार विरुद्धच्या ६-१ विजयात संघाचा भाग नव्हते.
गेरार्ड डयूलोफेयू आणि नेल्सन सेमेडो यांना संघात स्थान का नाही या वर विचारले असता ते म्हणाले, “त्यांना २८ तारखेला होणाऱ्या युएफा चॅम्पियनशीपच्या सामन्यासाठी विश्रांती मिळावी म्हणून बसवण्यात आले आहे.” बार्सेलोना संघाचा युएफा चॅम्पियनशीपचा सामना स्पोर्टींग लिसबोन या संघाशी होणार आहे.
यदाकदाचित आपणास माहिती नसेल तर –
# बार्सेलोना संघ सध्या ला लीगमध्ये पाच सामन्यात पाच विजय मिळवल्यामुळे १५ गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. मागील पाचही सामने या संघाने एकतर्फी जिंकले आहेत.
# बार्सेलोना संघाचा स्टार खेळाडू लियोनल मेस्सी याने ला लिगाच्या मागील पाच सामन्यात ९ गोल झळकावले आहेत. त्यात त्याने एका सामन्यात हॅट्रीक तर मागील सामन्यात चार गोल केले होते.