आयसीसी विश्वचषक 2027 साठी आता काहीच महिने शिल्लक राहिले आहेत. यामुळे सर्व संघ आपापल्या तयारीला लागले आहे. विश्वचषकात खेळणे आणि त्यामध्ये चांगली कामगिरी करणे प्रत्येक खेळाडूसाठी महत्त्वाचे असते. त्यासाठी संघात निवड होणे, अत्यावश्यक आहे. भारताने नुकतेच झिम्बाब्वेचा दौरा यशस्वीरित्या पूर्ण केला. यामध्ये युवा स्टार वैभव सूर्यवंशीने प्रभावी कामगिरी करत मालिकावीराचा पुरस्कार जिंकला. त्याची ही कामगिरी पाहून त्याला वनडे संघात स्थान दिले पाहिजे, असे वक्तव्य भारताच्या दिग्गजाने केले आहे.
भारताचे माजी विकेटकीपर-फलंदाज फारुख इंजिनिअर यांच्या मते, निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी 2027 च्या वनडे विश्वचषकाच्या तयारीसाठी वैभवचा लवकरात लवकर संघात समावेश करावा.
इंजिनिअर यांनी पीटीआयशी बोलताना आगामी विश्वचषकात भारताचा फलंदाजी क्रम कसा असावा, हे सांगितले आहे. ते म्हणाले, “रोहित शर्माने वैभवसोबत डावाची सुरूवात करावी. शुभमन गिल उत्कृष्ट खेळाडू आहे. तो सध्या संघातील सर्वोत्तम फलंदाज असून त्याने चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी यायला हवे.”
“गिल चेंडू उंच खेळत नाही. शिवाय वनडेमध्ये लेफ्ट-राईट कॉम्बिनेशन उत्तम ठरेल. त्यामुळे रोहितसोबत डावाची सुरूवात करण्यासाठी वैभव योग्यच. विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर आणि गिल चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आले तर, भारताची फलंदाजीही मजबूत होईल,” असे इंजिनिअर म्हणाले आहेत.
“वैभवला भारताच्या वनडे संघात समाविष्ट करण्याची हीच योग्य वेळ आहे. मला समजत नाही, लोक वनडे आणि टी20 सामन्यांमध्ये इतका फरक का करतात. तो धावा करत आहे आणि डावाची सुरूवातही उत्तम करण्याचा आत्मविश्वास त्याला आहे, ” असेही इंजिनिअर यांनी पुढे म्हटले आहे.
वैभवची आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यासाठी पहिल्यांदा भारतीय संघात निवड झाली होती. आयर्लंड दौऱ्यातील दोन्ही टी20 सामन्यांसाठी मात्र तो बाकावर बसला आणि इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्यातून त्याने आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. तेथे कामगिरी अपेक्षेप्रमाणे झाली नाही, मात्र झिम्बाब्वे दौऱ्यात त्याने कहर फलंदाजी केली.
वैभवने झिम्बाब्वे दौऱ्यातील तिन्ही सामन्यात खेळताना सर्वाधिक 151 धावा केल्या. त्याने आतापर्यंत 6 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून 102 चेंडूंचा सामना करताना 16 चौकार आणि 14 षटकारांच्या सहाय्याने 193 धावा केल्या आहेत. (Send Vaibhav Sooryavanshi to open with Rohit Sharma advice farokh engineer to Gambhir and Agarkar for 2027 odi World Cup)






