पिंपरी-चिंचवड येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय वरिष्ठ हॉकी स्पर्धेच्या अखेरच्या उपांत्यपूर्व सामन्यात चुरशीच्या लढतीत महाराष्ट्राने पेनल्टी शूट आऊटमध्ये तमिळनाडूचा पराभव केला. गोलरक्षक आकाश चिकटे महाराष्ट्राच्या विजयाचा शिल्पकार ठरला. पेनल्टीत त्याने दाखवलेला भक्कम बचाव निर्णायक ठरला. तमिळनाडूकडून चारही प्रयत्न अपयशी ठरले. तुलनेत महाराष्ट्राकडून दर्शन गांवकर यांनी आपले लक्ष्य अचूक साधून महाराष्ट्राचा विय साकार केला.
त्यापूर्वी, नियोजित वेळेत सामना २-२ असा बरोबरीत सुटला होता. सामन्याच्या ८व्या मिनिटाला प्रताप शिंदेच्या गोलने महाराष्ट्राने आघाडी घेतली होती. मध्यंतरापर्यंत ती त्यांनी कायम राखली. पण, त्यानंतर उत्तरार्धात दोन मिनिटांत दोन गोल करून तमिळनाडूने आघाडी घेतली होती. एस. कार्तीने हे दोन्ही गोल मारले. पिछाडीवर पडल्यानंतर मात्र महाराष्ट्राने आपला खेळ उंचावला. त्यांनी अखेरच्या मिनिटात कमालीचा आक्रमक खेळ करून तमिळनाडूच्या बचाव फळीवर दडपण आणले. याचा फायदा महाराष्ट्राला अखेरच्या मिनिटाला झाला. सामन्याच्या ६०व्या मिनिटाला कर्णधार तालेब शहाने गोल करून सामना बरोबरीत सोडवला.