मातृत्व लाभल्यामुळे क्रिकेटपासून दूर गेलेल्या नेहा तन्वरने पुन्हा एकदा क्रिकेटकडे आपले लक्ष्य वळवले आहे. तिची बांगलादेश अ संघाविरुद्ध होणाऱ्या वनडे मालिकेसाठी भारतीय अ संघात निवड झाली आहे.
३१ वर्षीय नेहाची वनडे पदार्पणाच्या सात वर्षानंतर भारतीय संघात निवड झाली आहे. नेहा २०१४ पर्यन्त भारतीय संघाची सदस्य होती. २०१४ ला तिला मुलगा झाल्यानंतर साहजिकपणे तिचे क्रिकेट मागे पडले. पण तिला क्रिकेटची आवड स्वस्थ बसू देत नव्हती. त्यामुळे तिने पुन्हा एकदा क्रिकेट खेळण्यास सुरवात केली. तिचे भारतीय संघात पुनरागमन करण्याचे ध्येय आहे.
या बद्दल बोलताना ती म्हणाली, “मातृत्व हे एका स्त्रीच्या आयुष्यातील महत्वाची गोष्ट आहे. ते तुमचे शरीर, जीवनशैली आणि प्राधान्यक्रममध्ये बदल घडवते. यामुळे अगदी जीवन बदलते. माझे मन क्रिकेटचा विचार करत असते. पती ऋतुराज आणि त्याची बहीण मी सराव करताना मुलाची काळजी घेतात. ते मला पूर्णपणे पाठिंबा देत आहेत. त्यामुळे मी माझ्या क्रिकेट कारकिर्दीतील दुसऱ्या इंनिंग त्यांना समर्पित करते.”
दिल्लीच्या या खेळाडूने फेब्रुवारी २०१४ ते डिसेंबर २०१६ पर्यन्त एकही सामना खेळला नाही. तिने सांगितले की या वेळात तिने टीव्हीवर सर्व प्रकारच्या क्रिकेटचे सामने पाहिले. तसेच युट्युबवरही काही क्लिप्स पाहिल्या.
तिला पुन्हा क्रिकेटकडे वळण्याची इच्छा असल्याने तिने तिच्या कुटुंबाशी चर्चा केली आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुन्हा खेळण्यास सुरुवात केली. तिने या काळात दिल्लीचे प्रतिनिधित्व केले. दिल्लीकडून खेळताना तिने चांगली कामगिरी केली. त्या जोरावरच तिची भारतीय अ संघात निवड झाली.
नेहा भारताकडून ५ वनडे आणि टी२० सामने खेळली आहे. तिने शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना २६ जुन २०११ रोजी खेळला आहे.