काल झालेल्या पुणेरी पलटण आणि यु मुंबाच्या सामन्यात मुंबईच्या झालेल्या मानहानीकारक पराभवाची जबाबदारी शब्बीर बापुने स्वतःवर घेतली आहे. यु मुंबाच्या संघातील एकही खेळाडू त्यांच्या नावाप्रमाणे कामगिरी करू शकला नाही. काशीलिंग आडके, शब्बीर बापू, नितीन मदने आणि स्वतः अनुप काही मोठी कमाल करू शकले नाहीत.
अनुप हा सामन्यातील सर्वात यशस्वी रेडर होता. पण मुंबाचा संघ कमी पडला तो डिफेन्समध्ये आणि मोक्याच्या वेळी रेडींगमध्ये गुण मिळवण्यात. शब्बीर बापू म्हणाला,”मी मोक्याच्यावेळी जेव्हा जेव्हा रेडींगसाठी गेलो तेव्हा तेव्हा मी बाद झालो आणि त्यामुळे आम्ही खेळात परत येण्याच्या अनेक संधी गमावल्या.”
पुणेरी पलटणचा संघ खेळाच्या सर्व विभागात मुंबा संघापेक्षा चंगला खेळला. काशीलिंग आणि नितीन मदने यांच्याकडून मुंबा संघाला खूप अपेक्षा होत्या पण त्यात ते कमी पडले. प्रेक्षकांना वाटत होते की महाराष्ट्राचे हे खेळाडू महाराष्ट्रातील संघासाठी खेळत असतील तर त्यांचा खेळ खूप उंचावेल पण त्यांचा खेळ पाहून सर्वांचा अपेक्षाभंग झाला.