---Advertisement---

शेफालीने टी20त रचला इतिहास, तिच्या वयाच्या कुठल्याच खेळाडूला जमला नाही ‘असा’ पराक्रम

Shafali-Verma-Record
---Advertisement---

भारतीय संघाने महिला आशिया चषक 2022मधील 15व्या सामन्यात शनिवारी (दि. 8 ऑक्टोबर) बांगलादेश संघाला 59 धावांनी पराभूत केले. या स्पर्धेतील भारतीय संघाने खेळलेल्या 5 सामन्यांतील हा चौथा विजय होता. या सामन्यात भारतीय संघाची सलामी फलंदाज शेफाली वर्मा हिने अफलातून फलंदाजी करत 55 धावांची अर्धशतकी खेळी केली. या सोबतच तिला सामनावीर पुरस्कारानेही गौरवण्यात आले. ताबडतोब अर्धशतक झळकावत शेफालीने एक जागतिक विक्रम आपल्या नावावर करत इतिहास रचला आहे. काय आहे तो विक्रम, चला जाणून घेऊया…

युवा महिला खेळाडू शेफाली वर्मा (Shafali Verma) हिने या सामन्यात सलामीला फलंदाजी करताना 44 चेंडूत 55 धावा कुटल्या. या धावा करताना तिने 2 षटकार आणि 5 चौकारही मारले. अनेक सामन्यात खराब फॉर्ममुळे प्लेईंग इलेव्हनमधून बाहेर होणाऱ्या शेफालीने या अर्धशतकासह तिच्या आंतरराष्ट्रीय टी20 कारकीर्दीतील 1000 धावांचा आकडाही पार केला आहे. शेफालीने असा कारनामा वयाच्या 18व्या वर्षी केला आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये 1000 धावा पूर्ण करणारी शेफाली ही सर्वात युवा खेळाडू बनली आहे. विशेष म्हणजे, अशी एकही खेळाडू नाहीये, जिने वयाच्या 21व्या वयापूर्वी 1000 धावा पूर्ण केल्या आहेत.

हरमनप्रीतच्या जागी मंधानाने केले नेतृत्व
सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) हिच्या जागी स्म्रीती मंधाना (Smriti Mandhana) संघाचे नेतृत्व केले. हरमनप्रीत या सामन्यात खेळली नाही. तिने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी शेफाली आणि स्म्रीतीने 12 षटकात 96 धावा चोपल्या. मंधानाला अर्धशतक पूर्ण करता आले नाही. ती 38 चेंडूत 47 धावा करून बाद झाली. तिने सहा चौकार लगावले. तिच्यानंतर शेफालीदेखील बाद झाली. भारतीय संघाने 114 धावांवर 2 विकेट्स गमावल्या होत्या.

शेफालीचा गोलंदाजीतही राडा
भारतीय संघाने दिलेल्या 160 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेश संघाला 20 षटकात 7 विकेट्स गमावत 100 धावाच करता आल्या. बांगलादेश संघाकडून फलंदाजी करताना कर्णधार निगार सुलताना (Nigar Sultana) हिने सर्वाधिक धावा केल्या. यावेळी तिने 29 चेंडूत 36 धावांची खेळी केली. या धावा करताना तिने 5 चौकारही मारले. तिच्याव्यतिरिक्त फरगाना होक (30) आणि मुर्शिदा खातून (21) यांनाच दोन आकडी धावसंख्या करता आली. याव्यतिरिक्त एकही फलंदाज 10 धावांची आकडा पार करू शकली नाही. यावेळी भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना दिप्ती शर्मा आणि शेफाली वर्मा यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तसेच, रेणुका सिंग आणि स्नेह राणा यांना प्रत्येकी 1 विकेट आपल्या नावावर करण्यात यश आले.

गुणतालिकेबद्दल बोलायचं झालं, तर भारतीय संघ पाच सामन्यांनंतर 8 गुण मिळवत अव्वलस्थानी विराजमान आहे. भारतीय संघाचा नेट रनरेट +2.590 इतका आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
क्या बात है! क्रिकेटनंतर ‘या’ खेळात नशीब आजमावणार सचिन आणि धोनी? लेटेस्ट फोटो व्हायरल
नाद करायचा नाय! पाकिस्तानकडून झालेल्या पराभवाचा बदला बांगलादेशकडून घेतला, टीम इंडिया पुन्हा टेबल टॉपर

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---