ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत तुफानी गोलंदाजी करणारा पाकिस्तानचा डावखुरा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी वनडे क्रमवारीत अव्वल स्थानी पोहचला आहे. शाहीननं अलीकडेच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत शानदार गोलंदाजी केली होती. पाकिस्ताननं ही मालिका 2-1 ने जिंकली. अशाप्रकारे पाकिस्तानचा संघ 22 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियात वनडे मालिका जिंकण्यात यशस्वी ठरला. या विजयात शाहीन आफ्रिदीची भूमिका महत्त्वाची होती.
आयसीसीनं जाहीर केलेल्या ताज्या वनडे क्रमवारीत शाहीन आफ्रिदीनं तीन स्थानांची झेप घेतली आहे. आता त्याचे 696 रेटिंग गुण झाले, जे त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील सर्वोत्तम आहे. अफगाणिस्तानचा राशिद खान 687 रेटिंग गुणांसह दुसऱ्या स्थानावर घसरला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत शाहीन आफ्रिदी हा दुसरा सर्वात यशस्वी गोलंदाज होता. शाहीननं तीन सामन्यांत 12.62 च्या सरासरीनं आठ विकेट्स घेतल्या होत्या. या मालिकेत हरिस रौफनं सर्वाधिक 10 विकेट घेतल्या.
आयसीसीच्या ताज्या क्रमवारीत भारताच्या जसप्रीत बुमराहलाही फायदा झाला आहे. विशेष म्हणजे, बुमराह बऱ्याच दिवसांपासून एकही एकदिवसीय सामना खेळलेला नाही. बुमराह न खेळता आठव्या स्थानावरून सहाव्या स्थानावर आला आहे. त्याचबरोबर भारताच्या मोहम्मद सिराजनंही ताज्या क्रमवारीत आगेकुच केली. तो दोन स्थानांनी झेप घेत सातव्या स्थानावर पोहचला आहे.
पाकिस्तानविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेनंतर जाहीर झालेल्या ताज्या क्रमवारीत ऑस्ट्रेलियाच्या ॲडम झम्पा आणि जोश हेझलवूड यांना नुकसान सहन करावं लागलं. ॲडम झम्पा चौथ्या स्थानावरून 9व्या स्थानावर घसरला. तर जोश हेझलवूड तीन स्थानांनी घसरून 10व्या स्थानावर आला आहे.
हेही वाचा –
अर्जुन तेंडुलकरचा गोलंदाजीत कहर! आयपीएल मेगा लिलावापूर्वी केली आश्चर्यजनक कामगिरी
आयसीसी क्रमवारीत सूर्यकुमार यादवला मोठा फटका; पहिल्या-दुसऱ्या नाही तर या स्थानी घसरण
अर्शदीप सिंग इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर, या बाबतीत होणार भारताचा ‘नंबर-1’ वेगवान गोलंदाज