बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी पाकिस्तानचा स्टार गोलंदाज शाहीन आफ्रिदीला संघातून वगळण्यात आल्यानं त्याला मोठा धक्का बसला आहे. टीम मॅनेजमेंटकडून सतत अन्यायकारक वागणूक मिळत असल्यानं शाहीन दु:खी आहे. बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीतील दारुण पराभवानंतर पीसीबीनं दुसऱ्या कसोटीपूर्वी शाहीनचा 12 सदस्यीय संघात समावेश केला नाही. याचाच अर्थ असा की, संघ व्यवस्थापनानं या डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाला पराभवासाठी जबाबदार धरलं आहे.
दुसऱ्या कसोटीसाठी पाकिस्ताननं अबरार अहमद आणि मीर हमजा यांचा 12 सदस्यीय संघात समावेश केला. मात्र या दोघांना प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाल्यास कोणते खेळाडू बाहेर पडतील, हे पाहणं उत्सुकतेचं असणार आहे.
रावळपिंडीतील पहिल्या कसोटीच्या मध्यावर शाहीन आफ्रिदीला पुत्ररत्नाची प्राप्ती झाली. सामना संपल्यानंतर तो पत्नी आणि मुलाला भेटण्यासाठी कराचीला गेला. त्यानंतर दोन दिवसांनी त्याला पुन्हा रावळपिंडीत बोलावण्यात आलं. वृत्तानुसार, जेव्हा टीम मॅनेजमेंटनं त्याला संघातून वगळल्याची माहिती दिली, तेव्हा या युवा वेगवान गोलंदाजाला धक्का बसला होता. जर खेळवायचंच नव्हतं, तर परत का बोलावलं? असा त्याचा सुर होता.
शाहीनला पाकिस्तानच्या टीम मॅनेजमेंटकडून असा धक्का बसण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी 2024 च्या टी20 विश्वचषकापूर्वी संघानं न्यूझीलंडविरुद्धची टी20 मालिका गमावल्यानंतर शाहीनचं कर्णधारपद काढून घेतलं होतं. याशिवाय त्यानं कसोटी फॉरमॅटमध्येही आपलं उपकर्णधारपद गमावलं आहे. यामुळे हा डावखुरा वेगवान गोलंदाज खूपच निराश झाला असून याचा त्याच्या मनावर परिणाम होत आहे.
वृत्तानुसार, शाहीननं स्वत:ला कसोटी मालिकेसाठी उपलब्ध ठेवण्यासाठी अनेक टी20 लीगमध्ये खेळण्याची ऑफर नाकारली होती. मात्र तो त्याच्या खराब कामगिरीमुळे संघ व्यवस्थापनाच्या निशाण्यावर आहे.
पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश दुसरा कसोटी सामना 30 ऑगस्टपासून सुरू होणार होता. परंतु पावसामुळे पहिल्या दिवसाचा खेळ नाणेफेक न होता रद्द झाला. सामन्याच्या उर्वरित चार दिवसातही पावसाची शक्यता आहे. अशा परिस्थितीत हा सामना पावसामुळे वाहून गेल्यास बांगलादेश मालिका 1-0 ने जिंकेल.
हेही वाचा –
पाकिस्तानने स्टेडियम विकले, खासगी बँकेकडून 100 कोटी वसूल; नावातही बदल होणार!
26 वर्षीय खेळाडूने रचला इतिहास; केवळ 5 कसोटी सामन्यातच केली करामत
“जो रुटला दोन जन्म घ्यावे लागतील, विराटचा…”, चाहत्यांनी घेतला मायकल वॉनचा क्लास