नुकताच पाकिस्तान दौऱ्यावर आलेल्या न्यूझीलंड संघाने सामन्यापूर्वी १५ मिनिटे आधी पाकिस्तान दौरा रद्द केला. सुरक्षेचा मुद्दा लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने म्हटले होते. दरम्यान क्रिकेट मैदान असो किंवा नसो, भारत आणि पाकिस्तान यांच्यात वेगवेगळ्या स्तरावर स्पर्धा ही सुरूच असते. पाकिस्तानचे खेळाडू भारताबद्दल नेहमी हीका ना काही विधाने करत राहतात, हे अनेक वेळा पाहिले गेले आहे. यावेळीही तसेच झाले आहे. पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने भारतावर निशाणा साधला आहे.
शाहिद आफ्रिदी एका कार्यक्रमात बोलत होता, त्यावेळी त्याने हे विधान केले. या संभाषणादरम्यान, आफ्रिदीला एक प्रश्न विचारण्यात आला होता की, ‘न्यूझीलंडच्या खेळाडूंना जे ई-मेल केले गेले ते भारताकडून करण्यात आले होते. कारण त्यांना पाकिस्तान आयोजित करत असलेल्या काश्मीर प्रीमियर लीगबद्दलचा सूड उगवायचा होता, आणि म्हणून भारताने हे घडवून आणले असावे?’
यावर शाहिद आफ्रिदीने आग ओकत म्हटले की, ‘आम्हाला जगाला सांगावे लागेल की, आम्हीही एक देश आहोत आणि यासाठी आपल्याला असे काही तरी कठोर निर्णय घ्यावे लागतील. आम्हालाही थोडा आदर आहे. एक देश आपल्या पाठीमागे लागला आहे, पण इतर देशांनी सुद्धा तीच चूक करू नये, जी ते करत आहेत. सर्व सुशिक्षित राष्ट्रे आहेत आणि त्यांनी भारताप्रमाणे करू नये.’
आफ्रिदी पुढे म्हणाला, ‘पाकिस्तानचे बोर्ड, तसेच येथील खेळाडूंनी न्यूझीलंडच्या बोर्डाशी बोलून क्रिकेटपटूंना राजी केले होते, जेणेकरून पाकिस्तानमध्ये पुन्हा क्रिकेट सुरू होऊ शकेल. पाकिस्तानमध्ये क्रिकेट परत आले आणि दहशतवादाविरोधात हा आमचा मोठा विजय होता. प्रत्येकाने आपापली भूमिका बजावली होती. कोणताही दौरा असाच सुरू होत नाही. त्या त्या देशातील सुरक्षा व्यवस्था पाहूनच परदेशी दौरे केले जातात.’
न्यूझीलंडने पाकिस्तान दौरा रद्द केल्यानंतर ईसीबीनेही पाकिस्तानचा दौरा रद्द केला आहे आणि पीसीबीला मोठा धक्का दिला. इंग्लंडचा महिला आणि पुरुष संघ पाकिस्तानचा डिसेंबरमध्ये पाकिस्तान दौरा करणार होता.
महत्त्वाच्या बातम्या-
-‘या’ खेळाडूची लागली ‘लॉटरी’, टी-२० विश्वचषकात घेणार हार्दिक पंड्याची जागा?
-मुंबई इंडियन्सचे ग्रह फिरले, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्धच्या दारुण पराभवानंतर गुणतालिकेत ‘मोठा’ धक्का
-हॅट्रिक पूर्ण करताच हर्षल मैदानावर सुसाट धावत सुटला, आरसीबीचा ‘विजयी क्षण’ एकदा पाहाच