तामिळनाडूचा फलंदाज शाहरुख खान (Tamilnadu Cricketer Shahrukh Khan) याने आपल्या धडाकेबाज फलंदाजीने पुन्हा एकदा धमाल उडवली आहे. विजय हजारे ट्रॉफी २०२१ (Vijay Hazare Trophy 2021) मध्ये तामिळनाडू आणि कर्नाटक यांच्यातील उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात त्याने ३९ चेंडूत नाबाद ७९ धावा केल्या. या खेळीच्या जोरावर तामिळनाडूने ८ बाद ३५४ धावा केल्या. या धावांपर्यंत पोहोचण्यात शाहरुख खानचा मोलाचा वाटा होता. त्याने आपल्या खेळीत सात चौकार आणि सहा षटकार मारले.
त्याच्याशिवाय सलामीवीर नारायण जगदीसनने शतक झळकावत १०२ धावा केल्या. आर साई किशोरने ६१ आणि दिनेश कार्तिकने ४४ धावा केल्या. मात्र, शाहरुखनेच तामिळनाडूच्या धावसंख्येला आकार दिला. त्याने फिनिशरची भूमिका उत्तमरित्या पार पाडली आणि शेवटच्या षटकांमध्ये धडाकेबाज खेळ केला. एका वेळी तामिळनाडूची धावसंख्या ४६ षटकांत ८ बाद २९० अशी होती. यानंतर पुढच्या २४ चेंडूत ६४ धावा झाल्या. या ६४ पैकी ५९ धावा शाहरुखच्या बॅटमधून निघाल्या.
शाहरुख खान ४१ व्या षटकात फलंदाजीला आला. ४४ व्या षटकापर्यंत तो १४ चेंडूत १७ धावांवर नाबाद होता. मात्र, त्यानंतर त्याने गीअर्स बदलले आणि तुफानी अर्धशतक ठोकले. त्याने २५ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. शाहरुख खानने गेल्या महिन्यात सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्येही आश्चर्यकारक कामगिरी केली होती. त्याने, कर्नाटकविरुद्धच्या अंतिम सामन्यात शेवटच्या चेंडूवर षटकार मारून तमिळनाडूला हरवलेला सामना जिंकून दिलेला. विजय हजारे ट्रॉफीमध्येही त्याच्या बॅटची धार गेली नाही. विजय हजारे ट्रॉफीमध्ये त्याने ३५ चेंडूत ६६, १२ चेंडूत ३२, ८ चेंडूत ८, १० चेंडूत ९ अशा धावा केल्या आहेत.
मेगा लिलावात मिळू शकते मोठी रक्कम
काही दिवसांत होणाऱ्या आयपीएलच्या मेगा लिलावात (IPL Mega Auction) शाहरूख पुन्हा एकदा मोठी किंमत मिळवू शकतो. आयपीएल २०२१ मध्ये पंजाब किंग्स संघाने त्याला तब्बल ५ कोटी रुपये देत आपल्या संघात सामील केले होते. मात्र, त्यांनी त्याला यावेळी कायम केले नाही. भारतीय फिनिशर म्हणून शाहरुखला या मेगा लिलावात तगडी किंमत मिळू शकते. (Shahrukh Khan PBKS)
महत्त्वाच्या बातम्या-
भारीच ना!! स्टेडियममध्ये सामना पाहण्यासाठी आलेल्या महिला प्रेक्षकाने टिपला भन्नाट झेल, पाहा व्हिडिओ
‘तीच गल्ली, तेच लोक, तेच प्रेम…’, आपल्या जन्मगावी पोहोचलेला कैफ जुने दिवस आठवून झाला भावुक
पाकिस्तान क्रिकेट पुन्हा बदनाम! प्रमुख खेळाडूवर अल्पवयीन मुलीने लावले लैंगिक शोषणाचे आरोप