मुंबई । सौरव गांगुली भारतीय क्रिकेटच्या इतिहासातला सर्वात यशस्वी कर्णधार मानला जातो. त्याच्याच नेतृत्वाखाली भारतीय संघाने अनेक ऐतिहासिक विजय मिळवले आहेत. भारतीय संघाव्यतिरिक्त सौरव गांगुलीने 2008 साली आयपीएलमध्ये कोलकाता नाइट रायडर्स संघाचेही कर्णधारपद सांभाळले होते.
मात्र आयपीएलमध्ये त्याला म्हणावे तसे यश मिळाले नाही. आयपीएलमधल्या नेतृत्वाबाबत त्याने 12 वर्षांनंतर एक महत्त्वपूर्ण विधान केले आहे. गांगुलीच्या मते, कोलकाता नाईट रायडर्सचा सहसंघमालक शाहरुख खानने त्याला नेतृत्व करताना कधीच स्वातंत्र्य दिले नाही.
2008 साली कोलकाता नाइट रायडर्स संघाचे नेतृत्व करणारा गांगुली म्हणाला की, चेन्नई सुपरकिंग्समध्ये धोनीला आणि मुंबई इंडियन्सच्या संघात रोहित शर्माला जसे स्वातंत्र्य मिळते तसे स्वातंत्र्य त्याला मिळाले नाही.
एका युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीदरम्यान गांगुली म्हणाला, ‘गौतम गंभीरची मी एक मुलाखत पाहिली होती, ज्यामध्ये गंभीरने सांगितले होते की शाहरुख त्याला म्हणाला होता, हा तुझाच संघ आहे. मी पण 2008 ला शाहरुखला हेच म्हटलो होतो, पण माझ्याबरोबर असे झाले नाही.’
“आयपीएलमधील तोच संघ चांगला जो सर्व काही खेळाडूंवर सोपवतो. चेन्नई सुपर किंग्सला पाहा एमएस धोनी तो संघ चालवतो. कोणते खेळाडू घ्यावे किंवा नाही हे सांगण्यासाठी रोहित शर्माकडे कोणी जात नाही. त्यावेळचे प्रशिक्षक जॉन बुकानन संघात चार चार कर्णधार असावे या मताचे होते,” असेही गांगुलीने नमूद केले.
कोलकाताचे त्यावेळीचे प्रशिक्षक जॉन बुकानन आणि सौरव गांगुली यांच्यातल्या मतभेदामुळे संघाच्या कामगिरीवर परिणाम होत असल्याच्या बातम्या समोर येऊ लागल्या होत्या. अखेर 2009 साली कोलकाता नाइट रायडर्स संघाने कर्णधारपदावरुन सौरव गांगुलीला दूर केले. पहिल्या दोन हंगामात कोलकाताचा संघ टॉप 4 संघात मध्ये कधीच पोहोचू शकला नाही. 2011 साली गांगुलीने कोलकाताच्या संघासोबत संबंध तोडले आणि पुणे वॉरियर्स संघासोबत तो जोडला गेला.
त्यानंतर शाहरुख खानने गौतम गंभीरकडे संघाचे नेतृत्व दिले. त्याने कोलकाताचे रुपडेच पालटले. गंभीरच्या नेतृत्वाखाली कोलकाताने दोनवेळा आयपीएल विजेतेपदावर नाव कोरले.
ट्रेंडिंग घडामोडी –
क्रिकेटर ते क्रीडामंत्री असा प्रवास केलेल्या माजी खेळाडूच्या पत्नीला कोरोनाची लागण
पोलिसांच्या कारवाईपासून जेव्हा स्वतःला वाचवत होता ‘हा’ क्रिकेटपटू, काही वेळातच झाला मृत्यू
दुखापतीमुळे जगातील सर्वात सुंदर महिला क्रिकेटपटूच्या स्वप्नांवर फेरले पाणी