पुणे। भारत विरुद्ध विंडीज संघात सुरु असलेल्या तिसऱ्या वनडे सामन्यात विंडीजने प्रथम फलंदाजी करताना 9 बाद 283 धावा केल्या आहेत. विंडीजकडून शाय होपने अर्धशतकी खेळी केली. तर भारताकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या.
या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाला बुमराहने योग्य ठरवत विंडीजच्या सलामीवीर फलंदाजांना लवकर बाद केले.
त्यानंतर त्यांचा अनुभवी फलंदाज मार्लोन सॅम्युएल्सही(9) लवकर बाद झाला. मात्र शाय होपने त्याची चांगली फलंदाजी सुरु ठेवली होती. त्याला शिमरॉन हेटमेयरने चांगली साथ दिली होती. या दोघांनी मिळुुन चौथ्या विकेटसाठी 56 धावांची अर्धशतकी भागीदारी रचली.
ही भागीदारी तोडण्यात कुलदीप यादवला यश आले. त्याने हेटमेयरला 37 धावांवर असताना बाद केले. त्याच्यापाठोपाठ रोवमन पॉवेलही(4) लवकर बाद झाला. पण यानंतर विंडीजचा कर्णधार जेसन होल्डरने होपला चांगली साथ देत त्याच्यासोबत सहाव्या विकेटसाठी 76 धावांची भागीदारी रचली.
या दोघांची भागीदारी रंगत असताना भुवनेश्वर कुमारने स्वत:च्याच गोलंदाजीवर होल्डरचा (32) धावांवर असताना झेल घेत त्याला बाद केले.
त्यानंतर काही वेळात होपलाही बुमराहने त्रिफळाचीत केले. होपचे शतक थोडक्यात हुकले. त्याने 113 चेंडूत 95 धावांची खेळी केली. यात त्याने 6 चौकार आणि 3 षटकार मारले.
अखेरच्या काही षटकात अॅशले नर्सने आक्रमक फटकेबाजी केली. या फटकेबाजीत त्याला केमार रोचने भक्कम साथ दिली. नवव्या विकेटसाठी या दोघांनी केलेल्या 56 धावांच्या भागीदारीमुळे विंडींजने 283 धावांचा टप्पा गाठला आणि भारतासमोर विजयासाठी 284 धावांचे आव्हान ठेवले.
नर्सने 22 चेंडूत 4 चौकार आणि 2 षटकारांच्या सहाय्याने 40 धावा केल्या. तसेच रोचने 19 चेंडूत 15 धावा केल्या.
भारताकडून जसप्रीत बुमराह(4/35), कुलदीप यादव(2/52), भुवनेश्वर कुमार(1/70), खलील अहमद(1/65) आणि युजवेंद्र चहलने(1/56) विकेट्स घेतल्या.
महत्त्वाच्या बातम्या:
–केदार जाधवचा विंडीज विरुद्ध शेवटच्या दोन वनडेसाठी टीम इंडियात समावेश
–प्रो कबड्डीत अशी कामगिरी करणारा अनुप कुमार सहावा खेळाडू
–ISL 2018: गोव्यातील नाचक्कीनंतर मुंबईचा नव्याने प्रारंभाचा प्रयत्न