आयसीसी टी२० विश्वचषकाचे पात्रता फेरी सामने खेळण्यास भाग पडलेला बांगलादेश संघाची गुरुवारी (२१ ऑक्टोबर) करा अथवा मरा लढत झाली. अल अमिरातच्या मैदानावर पापुआ न्यू गिनीविरुद्ध रंगलेल्या या सामन्यातील पराभवामुळे त्यांच्यावर टी२० विश्वचषकातून बाहेर होण्याची नामुष्की ओढावली असती. परंतु बांगलादेशच्या खेळाडूंनी या सामन्यात चांगला खेळ दाखवत तब्बल ८४ धावांच्या फरकाने विजय मिळवला आणि सुपर-१२ मध्ये प्रवेश केला आहे.
बांगलादेशच्या या विजयात अष्टपैलू शाकिब अल हसनचा मोठा वाटा राहिला. त्याने गोलंदाजीसह फलंदाजीतही मोठे योगदान देत संघाला विजय संपादन करुन दिला आहे. याबरोबरच त्याच्या नावे एक विशेष विक्रमाचीही नोंद झाली आहे.
पापुआ न्यू गिनीविरुद्ध बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी निवडली होती. बांगलादेशकडून प्रथम फलंदाजी करताना कर्णधार महमुदुल्लाहने सर्वाधिक ५० धावा चोपल्या. तसेच तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येत शाकिबनेही ४६ धावा फटकावल्या. ३७ चेंडूंचा सामना करताना ३ षटकारांच्या मदतीने त्याने या धावा केल्या. भलेही अवघ्या ३ धावांनी त्याचे अर्धशतक हुकले परंतु या खेळीसह त्याने टी२० विश्वचषकात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत सहाव्या स्थानी उडी घेतली आहे.
शाकिबची रोहितवर सरशी
आतापर्यंतच्या २० टी२० विश्वचषक सामन्यांमध्ये ३० च्या सरासरीने फलंदाजी करताना त्याने ६७५ धावा केल्या आहेत. यासह तो टी२० विश्वचषकात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत सहाव्या स्थानी आला आहे. याबाबतीत त्याने भारतीय सलामीवीर रोहित शर्माला मागे टाकले आहे. रोहित ६७३ धावांसह सातव्या क्रमांकावर घसरला आहे.
टी२० विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
टी२० विश्वचषकात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू माहेला जयवर्धने अव्वलस्थानी आहे. ३१ सामन्यांमध्ये १०१६ धावांसह तो प्रथमस्थानी आहे. त्यानंतर ख्रिस गेल ९७० धावांसह दुसऱ्या स्थानी आहे. तसेच तिलकरत्ने दिलशान (८९७ धावा), विराट कोहली (७७७ धावा) आणि एबी डिविलियर्स (७१७ धावा) टॉप-५मध्ये आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
सराव सामन्यातील भारताच्या यशाने मायकल वॉनचे बदलले सूर; आता म्हणतोय…
स्कॉटलंडची भरारी! ओमानला पराभूत करत साधली विजयाची हॅट्रिक; सुपर १२ मध्येही मिळवले स्थान
विराटची गोलंदाजी अन् स्मिथची बॅटिंग! ११ वर्षांनी सराव सामन्यादरम्यान घडला खास योगायोग