जय शाह यांनी नुकतेच आयसीसीचे नवे अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला. मात्र यामुळे त्यांना एक मोठं पद गमवावं लागलं आहे. वास्तविक, श्रीलंका क्रिकेट बोर्डाचे विद्यमान अध्यक्ष शम्मी सिल्वा आता आशियाई क्रिकेट परिषदेचे (ACC) नवे अध्यक्ष बनले आहेत. त्यांनी 2021 पासून या पदावर असलेल्या जय शाह यांची जागा घेतली. सिल्वा हे यापूर्वी एसीसीचे देखील भाग राहिले आहेत. तेथे त्यांनी अनेक वर्ष फायनन्स आणि मार्केटिंग समितीचं अध्यक्षपद भूषवलं आहे.
शम्मी सिल्वा यांनी एसीसीचे नवे अध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आणि आशियाई क्रिकेटला नव्या उंचीवर नेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार अशी आशा व्यक्त केली. ते म्हणाले, “आशियाई क्रिकेट परिषदेचं नेतृत्व करणे हा सन्मान आहे. क्रिकेट हा खेळ आशियाई चाहत्यांच्या हृदयाची धडधड आहे. आशियातील खेळाला नव्या उंचीवर नेण्यासाठी मी सर्व देशांसोबत काम करेन. उदयोन्मुख खेळाडू देण्याचा आमचा प्रयत्न असेल. प्रत्येकाला संधी मिळेल आणि या सुंदर खेळाच्या मदतीनं सर्वांशी संबंध सुधारण्याचा प्रयत्न करेल.”
आशियाई क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारताना शम्मी सिल्वा यांनी जय शाह यांचं आभार मानलं. सिल्वा 2019 पासून श्रीलंका क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष आहेत. जय शाह यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, आयसीसीचे अध्यक्ष झाल्यानंतर त्यांना केवळ एसीसीचे अध्यक्षपदच नाही तर बीसीसीआयचं सचिवपदही सोडावं लागलं. जय शाह यांच्यानंतर बीसीसीआयला अद्याप नवा सचिव मिळालेला नाही. या पदासाठी दिल्ली क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहन जेटली यांचं नाव आघाडीवर आहे.
शम्मी सिल्वा हे एसीसीचं अध्यक्षपद भूषवणारे पहिले श्रीलंकन व्यक्ती नाहीत. त्यांच्यापूर्वी गामिनी दिसानायके, उपाली धर्मदासा, थिलंगा सुमथीपाल, जयंता धर्मदासा, अर्जुन रणतुंगा यांनीही ही जबाबदारी सांभाळली आहे.
हेही वाचा –
ऑस्ट्रेलियातही लोड शेडिंगची समस्या! ॲडलेड मैदानावरची वीज वारंवार खंडीत
भारताला विकेटच मिळेना, ॲडलेड कसोटीवर ऑस्ट्रेलियाची मजबूत पकड
बुमराहची कपिल-झहीरच्या स्पेशल क्लबमध्ये एंट्री! यावर्षी अशी कामगिरी करणारा जगातील पहिलाच गोलंदाज





