भारत व पाकिस्तान यांच्यातील आशिया चषकाचा बहुप्रतिक्षित सामना अखेरच्या षटकापर्यंत रंगला. अटीतटीच्या झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने शानदार खेळ दाखवत पाच गड्यांनी विजय मिळवला. भारतीय संघाच्या या विजयानंतर अनेक दिग्गजांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे माजी अध्यक्ष असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा देखील भारतीय संघाच्या विजयानंतर जल्लोष करत असलेला एक व्हिडिओ समोर आला आहे.
मागील वर्षी टी20 विश्वचषकात भारतीय संघाला पाकिस्तान कडून पराभव पत्करावा लागला होता. त्या पराभवाचे उट्टे काढत भारतीय संघाने पाकिस्तानला पराभूत केले. अत्यंत रोमांचक झालेल्या या सामन्यातील भारताच्या विजयानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी एक व्हिडिओ आपल्या फेसबुक अकाउंटवरून शेअर केला आहे. दहा सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये बीसीसीआयचे माजी अध्यक्ष असलेले शरद पवार हे जल्लोष करण्याचा मोह आवरू शकले नाहीत, असे दिसून येते. हार्दिक पड्या याने अखेरचा षटकार मारताच, शरद पवार हे दोन्ही हात उंचावून जल्लोष करताना दिसले.
https://www.instagram.com/reel/Ch0BsTABI4e/?igshid=YmMyMTA2M2Y=
https://fb.watch/fbtSCRSWb1/
या सामन्या बद्दल बोलायचे झाल्यास, दुबई येथे झालेल्या या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. त्याचा हा निर्णय सर्वच गोलंदाजांनी सार्थ ठरवला. भुवनेश्वर कुमारने सर्वाधिक चार तर हार्दिक पंड्याने तीन बळी घेत पाकिस्तानचे कंबरडे मोडले. गोलंदाजांच्या या उत्कृष्ट कामगिरीमूळे पाकिस्तानचा डाव 147 धावांवर आटोपला. प्रत्युत्तरात, भारताची सुरुवात ही खराब झाली. राहुल शून्यावर माघारी परतला. तर, जम बसल्यानंतर विराट कोहली, रोहित शर्मा व सूर्यकुमार यादव माघारी परतले. मात्र, अष्टपैलू हार्दिक पंड्या व रवींद्र जडेजा यांनी फलंदाजी आपले मोलाचे योगदान देत भारताचा विजय साकारला. अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या हार्दिक पंड्याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.