गेल्या काही दिवसांपासून ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात चौथा आणि निर्णायक कसोटी सामना चालू असून आज (१८ जानेवारी) या सामन्याचा चौथा दिवस होता. यादिवशी मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर यांनी मिळून ऑस्ट्रेलियन संघाला एका-नंतर-एक दणके दिले. यामुळे दुसऱ्या डावात २९४ धावांवर ऑस्ट्रेलिया संघ सर्वबाद झाला. यासह पहिल्या डावातील ३३ धावांच्या आघाडीत भर पाडत दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने भारतापुढे ३२८ धावांचे आव्हान दिले. दरम्यान एक खास विक्रम शार्दुलच्या नावावर झाला आहे.
ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात वेगवान गोलंदाज शार्दुलने ऑस्ट्रेलियाच्या ४ फलंदाजांना माघारी धाडले. १९ चेंडूत ६१ धावा देत त्याने या विकेट्स काढल्या. यात मार्कस हॅरीस, कॅमरॉन ग्रीन, कर्णधार टीम पेन आणि नॅथन लायन यांचा समावेश आहे. तत्पुर्वी ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात शार्दुलने ३ विकेट्स घेतल्या होत्या. २४ षटकात ९४ धावा देत त्याने या विकेट्स घेतल्या होत्या. अशाप्रकारे ब्रिस्बेन कसोटीत शार्दुलने एकूण ७ ऑस्ट्रेलियन फलंदाजांना बाद केले आहे.
याबरोबरच भारताच्या पहिल्या डावात त्याने तडाखेबंद अर्धशतकी खेळी केली होती. आठव्या क्रमांकावर फलंदाजीला येत ११५ चेंडूत ६७ धावा त्याने केल्या होत्या. या खेळीसाठी त्याने २ षटकार आणि ९ चौकार मारले होते.
अशाप्रकारे ऑस्ट्रेलियाच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध एका कसोटी सामन्यात ७ किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेणारा, सोबतच अर्धशतक करणारा शार्दुल भारतातील पहिला आणि जगातील दुसरा खेळाडू ठरला आहे. त्याच्यापुर्वी दक्षिण आफ्रिकाचा खेळाडू डेल स्टेन याने हा किर्तीमान नोंदवला होता.
२७ डिसेंबर ते ३१ डिसेंबर २००८ या कालावधीत ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात मेलबर्न येथे कसोटी सामना झाला होता. या सामन्यात स्टेनने दोन्ही डावात प्रत्येकी ५ अशा एकूण १० विकेट्स घेतल्या होत्या. तर दुसऱ्या डावात फलंदाजी करताना १९१ चेंडूत ७६ धावा केल्या होत्या. यात त्याच्या १ षटकार आणि ९ चौकारांचा समावेश होता.
महत्त्वाच्या बातम्या-
कौतुक तर होणारच! ब्रिस्बेन कसोटीत मोहम्मद सिराजचा ‘फाइव्ह विकेट हॉल’, भारतीय दिग्गजांनी केली प्रशंसा
रोहित शर्मा बनला ‘कॅच’ मास्टर; ब्रिस्बेन कसोटीत तब्बल ‘इतके’ झेल घेत केली दिग्गजाची बरोबरी
कांगारूंच्या देशात भारतीयांचा वचक! ऑस्ट्रेलियात कसोटी पदार्पण करत सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज