---Advertisement---

‘तुम्ही माझ्या कामगिरीची दखल घेणं हीच मोठी बाब’, आनंद महिंद्रा यांच्या महागड्या भेटीनंतर शार्दुलचं भाष्य

On: सोमवार, जानेवारी 25, 2021 4:54 PM
---Advertisement---

ब्रिस्बेनच्या द गॅबा मैदानावर झालेल्या चौथ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने अविश्वसनीय कामगिरी करत ऑस्ट्रेलियन संघाला ३ विकेट्सने धूळ चारली. यासह भारतीय संघाने चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत २-१ अशा फरकाने विजय मिळविला. विशेष म्हणजे, युवा खेळाडूंचा भरणा असतानाही संघाने एवढे घवघवीत यश मिळवले. त्यानंतर महिंद्रा ऍण्ड महिंद्राचे कार्यकारी अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी युवा भारतीय खेळाडूंना बक्षीस म्हणून महिंद्रा कार भेट देण्याचे जाहीर केले. याबद्दल शार्दुल ठाकूर याने त्यांचे आभार व्यक्त केले आहेत.

आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटद्वारे प्रतिक्रिया देत मराठमोळ्या शार्दुलने लिहिले की, “आनंद महिंद्रा यांच्याकडून मिळालेल्या भेटीसाठी मी त्यांचा आभारी आहे. तुम्ही माझ्या कामगिरीची दखल घेणे हीच माझ्यासाठी मोठी बाब आहे. तुमचे हे पाऊल माझ्यासारख्या अनेक युवा तरूणांसाठी प्रेरणादायी ठरेल याची खात्री आहे. तुम्ही जसे म्हणता, तसे मी अशक्य गोष्टीही साध्य करून दाखवण्याचा प्रयत्न करत राहील.”

भारताला अभूतपूर्व यश मिळवून देणाऱ्या भारतीय संघातील युवा खेळाडूंवर खूष होत महिंद्रा यांनी त्यांना महिंद्रा कार भेट देण्याचे ठरवले आहे. महत्त्वाचे म्हणजे, कंपनीच्या नव्हे तर स्वत:च्या पैशाने ते भारताच्या नवोदित खेळाडूंना आलिशान महिंद्रा कार बक्षीसाच्या रुपात देणार आहेत. यात मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर, टी नटराजन, शार्दुल ठाकूर, शुबमन गिल आणि नवदीप सैनी या युवा भारतीय क्रिकेटपटूंचा समावेश आहे.

चहूकडून कौतुकांचा वर्षाव होत असताना भारतातील आघाडीचे उद्योजक असणाऱ्या आनंद महिंद्रा यांच्याकडून बक्षीस मिळाल्याने या युवा खेळाडूंचा आत्मविश्वास दुणावला असावा.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील दमदार कामगिरीमुळे सिराज, सुंदर, शार्दुल आणि शुबमन यांना येत्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात संधी मिळाली आहे. ५ फेब्रुवारीपासून या दौऱ्याची सुरुवात होणार आहे. पहिले दोन कसोटी सामने चेन्नई येथे खेळवले जाणार आहेत. तर अखेरचे दोन सामने अहमदाबाद येथे होतील. ८ मार्च रोजी कसोटी मालिका संपेल.

महत्त्वाच्या बातम्या-

ऑस्ट्रेलिया भूमीवरील ऐतिहासिक विजयानंतर आनंद महिंद्रा खुश! युवा पदार्पणवीरांना देणार ‘ही’ महागडी भेट

अरर! धवनने तोडली बर्ड फ्लूची गाइडलाइन, नावाड्यांना भोगावी लागली मोठी शिक्षा 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---