भारतीय संघ नुकताच दक्षिण आफ्रिका दौरा संपवून मायदेशी परतला आहे. मायदेशी परतल्यावर अनेक भारतीय खेळाडू त्यांच्या खाजगी वाहनातून आपापल्या घरी परतले. पण त्यातील एक खेळाडू असा आहे ज्याने चक्क लोकलने घरी जाणे पसंत केले.
या खेळाडूने दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतण्यासाठी बाकी खेळाडूंप्रमाणेच विमानाच्या बिसिनेस वर्गातून प्रवास केला मात्र मुंबईत परतताच त्याने अंधेरी रेल्वे स्थानक गाठले आणि त्यानंतर लोकलच्या फर्स्ट क्लास कंपार्टमेंटमधून प्रवास करत हा खेळाडू त्याच्या घरी परतला. हा खेळाडू म्हणजे मुंबईतील पालघर येथे राहणारा वेगवान गोलंदाज शार्दूल ठाकूर.
Times of Ipl Contracts & Times of being a Current India Player too…A Boy still traveling by Train to his home after coming from South Africa..Touched to see these feet on the ground..Do well Shardul Thakur… pic.twitter.com/iezE3DsZNM
— Reetinder Sodhi (@ReetinderSodhi) March 2, 2018
त्याच्या या रेल्वे प्रवासाबद्दल त्याने इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे. शार्दूल पहिल्यापासून रेल्वेने प्रवास करायचा त्यामुळे लोक त्याला पालघर ते मुंबई हा लांबचा प्रवास करून टाइमपास करू नकोस असे म्हणायचे तसेच ते असेही म्हणायचे की एवढा लांबचा प्रवास करून कोणी भारतासाठी खेळू शकेल का?
पण आता शार्दुलने या सगळ्या गोष्टींना चुकीचे ठरवत भारतीय संघात स्थान मिळवले आहे आणि त्याने भारतीय संघातून कामगिरीही चांगली केली आहे. त्यामुळे भारतीय संघात खेळूनही तू रेल्वेने प्रवास करतोस तर आतातरी लोकांची तुझ्याबद्दलची मते बदलली आहेत का? या प्रश्नाचे उत्तर देताना शार्दूल म्हणाला,
” ते लोक आता म्हणतात की तो मुलगा जो आमच्याबरोबर लोकलने प्रवास करायचा तो आता भारतीय संघातून खेळतो. दक्षिण आफ्रिकेतून मुंबईत विमानाने परतल्यावर मी अंधेरीवरून लोकल पकडली. म्हणजे सरळ बिसनेस क्लास ते फर्स्ट क्लास. मला घरी लवकर घरी परतायचे होते. पण मला कळालं की लोकलच्या डब्यातील लोक माझ्याकडे बघत आहेत आणि मी खरंच शार्दूल ठाकूर आहे का असा प्रश्न त्यांना पडला होता. त्यातील काही कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी गूगल करून माझे फोटो बघून खात्री करून घेतली.
” त्यानंतर त्यांनी मला सेल्फीसाठीसुद्धा विचारले. तेव्हा मी त्यांना सांगितले पालघर येईपर्यंत थोडावेळ थांबा. अनेकांना भारताचा क्रिकेटपटू त्यांच्याबरोबर लोकलने प्रवास करतो याचे आश्चर्य वाटत होते. त्यातील काही जुन्याप्रवासांना मी अनेक वर्षांपासून लोकलने प्रवास करतो हे आठवत होते. माझे पाय मला नेहेमीच जमिनीवर ठेवायचे आहेत. मला जे काही मिळाले आहे त्यासाठी मी कठोर परिश्रम घेतले आहेत.”
मुंबईच्या अनेक खेळाडूंना त्यांच्या सुरवातीच्या दिवसात रेल्वेने प्रवास करावा लागला आहे हे सर्वांनाच माहित आहे. पण आंतराष्ट्रीय स्थरावर खेळूनही पाय जमिनीवर ठेवण्यासाठी रेल्वेने प्रवास करण्याचे शार्दूल ठाकूर सारखे उदाहरण क्वचितच आढळते.
याआधी काही महिन्यांपूर्वी भारताचा माजी कर्णधार एम एस धोनीनेही झारखंड संघाबरोबर रेल्वेने प्रवास केला होता.
शार्दुलने त्याला दक्षिण आफ्रिकेत मिळालेल्या संधीचे सोने केले आहे. त्याला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या शेवटच्या वनडे सामन्यात संधी मिळाली होती. या सामन्यात त्याने ४ विकेट्स घेत भारताच्या विजयात महत्वाची कामगिरीही बजावली होती.
तसेच त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी २० सामन्यातही चांगली कामगिरी केली होती. तसेच त्याची ६ मार्च पासून श्रीलंकेत होणाऱ्या टी २० तिरंगी मालिकेसाठीही भारतीय संघात निवड झाली आहे.