क्रिकेट या खेळाला अनेक दिग्गज क्रिकेटपटूंचा वारसा लाभला आहे. त्यामुळे जगभरातील असेही काही खेळाडू असतात, जे क्रिकेटप्रेमींना वाटते की ते त्यांच्या संघात हवे होते. असेच काहीसे प्रचलन सध्या क्रिकेटविश्वात चालू आहे. क्रिकेटमधील अनेक दिग्गज खेळाडू आपले सर्वकालीन क्रिकेट संघ बनवत आहेत, ज्यामध्ये वेगवेगळ्या संघातील महान खेळाडूंचा समावेश केला जात आहे.
दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज शॉन टेटने देखील या प्रचलनाचे अनुकरण करत त्याचा सर्वकालीन ११ खेळाडूंचा संघ बनवला आहे. यामध्ये त्याने तब्बल ४ भारतीय खेळाडूंचा समावेश केला आहे. टेट नुकताच अफगाणिस्थान क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्त झाला आहे. टेट हा त्याच्या काळातील सर्वात वेगवान गोलंदाजांपैकी एक असा गोलंदाज होता, ज्याने त्याच्या वेगाच्या जोरावर अनेक फलंदाजांची पळता भुई थोडी करून सोडले होते.
टेटने ‘स्पोर्ट्स किडा’ या वेबसाईटसोबत चर्चा करताना त्याचा सर्वकालीन ११ खेळाडूंचा संघ निवडला आहे. यात त्याने ४ भारतीय खेळाडूंना निवडले आहे. तर ऑस्ट्रेलियाकडून देखील त्याने तितकेच खेळाडू निवडले आहेत. सोबतच वेस्टइंडीज आणि पाकिस्तान या देशातील खेळाडूंना देखील त्याने आपल्या संघात निवडले आहे.
टेटने त्याच्या संघात सलामीचे फलंदाज म्हणून ऑस्ट्रेलियाचा ॲडम गिलख्रिस्ट आणि भारताचा धडाकेबाज फलंदाज वीरेंद्र सेहवाग यांना स्थान दिले आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर त्याने रिकी पॉंटिंगला संघात स्थान दिले. सचिन तेंडुलकरला त्याने आपल्या संघात चौथ्या क्रमांकावर ठेवले असून पाचव्या क्रमांकावर ब्रायन लाराला संधी दिली. त्याचबरोबर ६ व्या आणि ७ व्या क्रमांकावर विराट कोहली आणि एमएस धोनी यांना त्याने निवडले. त्यानंतर गोलंदाजीची धुरा त्याने शेन वॉर्न, वसीम अक्रम, ग्लेन मॅकग्रा आणि शोएब अख्तर यांच्यावर सोपवली.
टेटने दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि इंग्लंडसारख्या देशातील एकाही खेळाडूला आपल्या संघात स्थान दिले नाही. विशेष म्हणजे श्रीलंकाचे दिग्गज खेळाडू महेला जयवर्धने आणि कुमार संघकारा हे देखील त्याच काळातील खेळाडू होते. यांना मात्र त्याने आपल्या संघात स्थान नाही दिले.
शॉन टेटची सर्वकालिन वनडे प्लेइंग इलेव्हन:
विरेंद्र सेहवाग (IND), ऍडम गिलख्रिस्ट (AUS), रिकी पाँटिंग (AUS), सचिन तेंडुलकर (IND), ब्रायन लारा (WI), विराट कोहली (IND), एमएल धोनी (IND), शेन वॉर्न (AUS), वसीम अक्रम (PAK), ग्लेन मॅकग्रा (AUS), शोएब अख्तर (PAK)
महत्वाच्या बातम्या –
–‘या’ठिकाणी चुकतो विराट, दिग्गज भारतीयाने कोहलीच्या फलंदाजीचे केले विश्लेषण
–‘अरे भाऊ, मस्त!’, हार्दिकच्या नव्या लूकची सोशल मीडियावर चर्चा, पाहा फोटो
–फाफ डू प्लेसिस ‘द हंड्रेड’मधून पडला बाहेर, नॉदर्न सुपरचार्जर्ससाठी लिहिली भावनिक पोस्ट