वेस्ट इंडीज आणि भारत यांच्यादरम्यान २२ जुलैपासून तीन वनडे सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व अनुभवी सलामीवीर शिखर धवन करेल. नुकताच इंग्लंड दौरा संपवून आलेल्या भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माला या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आले आहे. तसेच शिखरच्या नेतृत्वात अनेक युवा खेळाडूंना संधी मिळू शकते. मात्र, कर्णधार म्हणून शिखरची कामगिरी कशी होते यावर सर्वांची नजर असेल.
इंग्लंड दौऱ्यावर शिखर धवन सलामीवीर म्हणून बऱ्याच काळानंतर भारतीय संघात पुनरागमन करत होता. त्याच्यासाठी ती वनडे मालिका तितकीशी चांगली राहिली नाही. पहिल्या सामन्यात भारतीय संघ १११ धावांचा पाठलाग करत असताना तो २७ धावांवर नाबाद राहिला. मात्र, पुढील दोन्ही सामन्यात त्याला दुहेरी आकडा गाठता आला नाही. त्यामुळे वेस्ट इंडिजविरुद्ध खेळाडू आणि कर्णधार अशा दुहेरी जबाबदारीतून त्याला वाट काढावी लागेल. शिखर दुसऱ्यांदा भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे. मागील वर्षी त्याने श्रीलंका दौऱ्यावर भारतीय संघाचे कर्णधारपद भूषवलेले. त्या दौऱ्यावर तीनपैकी दोन वनडे जिंकण्यात भारतीय संघाला यश आलेले. तर, टी२० मालिकेत भारतीय संघ पराभूत झालेला.
यावेळी देखील शिखरसोबत युवा भारतीय संघ आहे. त्यामुळे वेस्ट इंडीज संघाला त्यांच्या घरच्या मैदानावर पराभूत करण्याचे आव्हान शिखर आणि इतर खेळाडूंसमोर असेल.
शिखरप्रमाणेच वेस्ट इंडीज संघाचा कर्णधारही नवखा आहे. कायरन पोलार्ड निवृत्त झाल्यानंतर यष्टिरक्षक निकोलस पूरनच्या खांद्यावर ही जबाबदारी देण्यात आली. त्याच्या नेतृत्वात वेस्ट इंडीज संघ आतापर्यंत ११ वनडे खेळला असून त्यापैकी फक्त तीन सामने त्यांना जिंकण्यात यश आलेय. त्यामुळे या मालिकेत दोन्ही कर्णधारांच्या नेतृत्वाचा कस लागताना दिसेल.
भारतीय संघाने वेस्ट इंडीजमध्ये आतापर्यंत यजमान संघाविरुद्ध ३९ सामने खेळलेत. त्यापैकी २० सामने वेस्ट इंडीजने आपल्या नावे केले आहेत. तर १६ सामन्यांचा निकाल भारताच्या बाजूने लागला आहे. इतर तीन सामन्याचा कोणताही निकाल लागला नाही. मात्र, मागील ५ पैकी ४ सामन्यात भारतीय संघाने सरशी साधली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘तो सर्वोत्कृष्ट कर्णधार’, नुकत्याच निवृत्त झालेल्या इंग्लंडच्या दिग्गजाचे मोठे विधान
‘ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है!’ राष्ट्रकुल स्पर्धेत सहभागी होण्यामागे आयसीसीची मोठी रणनिती
‘वनडे क्रिकेट बंद करून टाका…’, माजी पाकिस्तानी दिग्गजाच्या सल्ल्याने उडाली खळबळ