श्रीलंका आणि भारत यांच्यादरम्यान सुरू असलेल्या तीन सामन्यांच्या टी२० मालिकेतील अखेरचा आणि निर्णायक सामना कोलंबो येथील आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळला जात आहे. भारतीय कर्णधार शिखर धवनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. मात्र, त्याचा हा निर्णय श्रीलंकेच्या गोलंदाजांनी चुकीचा ठरवत. पहिल्या पाच षटकांमध्ये भारताचे आघाडीचे ४ फलंदाज केवळ २४ धावांमध्ये माघारी धाडले. भारतीय कर्णधार शिखर धवन हादेखील खाते खोलू शकला नाही व पहिल्याच चेंडूवर बाद होऊन परतला. याचबरोबर त्याच्या नावे एक नकोसा विक्रम जमा झाला.
धवनच्या नावे नकोसा विक्रम
या निर्णायक सामन्यासाठी भारतीय संघाने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. मात्र, डावाच्या पहिल्या षटकात भारतीय संघाला मोठा धक्का बसला. श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज दुष्मंता चमिराने चौथ्या चेंडूवर भारतीय कर्णधार शिखर धवनला स्लिपमध्ये उभ्या असलेल्या धनंजया डी सिल्वाच्या हाती झेल देण्यास भाग पाडले. धवन पहिल्याच चेंडूवर खाते न खोलता ‘गोल्डन डक’ झाला.
‘गोल्डन डक’ वर बाद होताच शिखर धवनच्या नावे एक नकोसा विक्रम जमा झाला. शिखर टी२० क्रिकेटमध्ये पहिल्याच चेंडूवर बाद होणारा पहिला भारतीय कर्णधार बनला. अशाच प्रकारे कसोटी क्रिकेटमध्ये ‘गोल्डन डक’ वर बाद होणारे पहिले भारतीय कर्णधार लाला अमरनाथ हे होते. तर, वनडेमध्ये ही नकोशी कामगिरी भारताचे दिग्गज सलामीवीर व माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी केली होती.
भारतीय संघाची दयनीय अवस्था
तीन सामन्यांची टी२० मालिका बरोबरीत असताना निर्णायक तिसऱ्या सामन्यात भारतीय संघाची फलंदाजी अत्यंत निराशाजनक राहिली. या सामन्यात खेळत असलेले भारताचे प्रमुख पाच फलंदाज ९ षटकात केवळ ३६ धावांत माघारी परतले. तसेच भारतीय संघ २० षटकांत ८ बाद ८१ धावाच करु शकला. आपला वाढदिवस साजरा करत असणाऱ्या वनिंदू हसरंगाने चार, तर कर्णधार दसून शनाकाने दोन बळी आणि रमेश मेंडिस व दुष्मंता चमिरा यांनी प्रत्येकी एक बळी आपल्या नावावर केला.
महत्त्वाच्या बातम्या –
संयमाचे मिळाले फळ! वयाच्या तिशीत वॉरियर खेळतोय पहिला आंतरराष्ट्रीय सामना
त्याच नशीबच फुटके! ‘त्या’ घटनेनंतर सैनी जोरदार ट्रोल, चाहत्यांनी शेअर केले मजेदार मीम्स