वेस्ट इंडीज आणि भारत यांच्यादरम्यान २२ जुलैपासून तीन वनडे सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व अनुभवी सलामीवीर शिखर धवन करेल. नुकताच इंग्लंड दौरा संपवून आलेल्या भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माला या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आले आहे. शिखरच्या नेतृत्वात अनेक युवा खेळाडूंना संधी मिळू शकते. त्याचवेळी स्वतः कर्णधार शिखर धवन याच्याकडे काही विक्रम करण्याची संधी आहे.
रोहितच्या अनुपस्थितीत शिखर प्रथमच भारतीय उपखंडाच्या बाहेर नेतृत्व करेल. तीन सामन्यांच्या या मालिकेत त्याच्याकडे काही विक्रम करण्याची संधी आहे. शिखर वेस्ट इंडिजमध्ये सर्वाधिक वनडे सामने खेळणारा भारतीय खेळाडू बनू शकतो. त्याने आतापर्यंत कॅरेबियन भूमीवर एकूण १४ वनडे सामने खेळले आहेत. या मालिकेत तो भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीचा विक्रम मोडू शकतो. विराटने आतापर्यंत वेस्ट इंडिजमध्ये एकूण १५ सामने खेळले आहेत. दुसऱ्या सामन्यात मैदानावर उतरताच हा विक्रम शिखरच्या नावे जमा होईल.
याव्यतिरिक्त शिखरकडे आणखी एक विक्रम स्वतःच्या नावे करण्याची संधी आहे. शिखर या मालिकेत वेस्ट इंडीजमध्ये भारताकडून सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज बनू शकतो. विराटने येथे ४ शतकांसह ७९० धावा बनवलेल्या आहेत. त्याच्यानंतर विद्यमान कर्णधार रोहित शर्मा, युवराज सिंह व माजी कर्णधार एमएस धोनी यांचा क्रमांक लागतो. शिखरने येथे आजवर ३४८ धावा जमवल्या आहेत. आगामी तीन सामन्यांच्या मालिकेत आणखी १५० धावांची भर घातल्यास तो या यादीत दुसऱ्या स्थानी पोहचेल. भारतीय संघ या दौऱ्यावर तीन सामन्यांची वनडे मालिका, तसेच पाच सामन्यांची टी२० मालिका खेळेल. टी२० मालिकेसाठी रोहित शर्मा पुन्हा एकदा संघाचा कर्णधार असेल. वनडे मालिकेतील पहिला सामना २२ जुलै रोजी पोर्ट ऑफ स्पेन येथे खेळला जाईल.
महत्त्वाच्या बातम्या-
‘ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है!’ राष्ट्रकुल स्पर्धेत सहभागी होण्यामागे आयसीसीची मोठी रणनिती
‘वनडे क्रिकेट बंद करून टाका…’, माजी पाकिस्तानी दिग्गजाच्या सल्ल्याने उडाली खळबळ
न्यूझीलंडचा दिग्गज म्हणतोय, “त्याला भारतीय संघात घेतले नाही तर विरोधक जल्लोष करतील”