दिल्ली। येथील फिरोजशहा कोटला स्टेडिअमवर सुरु असलेल्या भारत विरुद्ध श्रीलंका संघातील तिसऱ्या आणि अंतिम कसोटी सामन्यात आज सामन्याच्या चौथ्या दिवशी भारतीय सलामीवीर शिखर धवनने आपल्या ३२ व्या वाढदिवसाच्या दिवशी मोठा विक्रम केला आहे.
शिखरने या सामन्यात प्रथम श्रेणीतील आपल्या ८००० धावा पूर्ण केल्या आहेत. त्याला या ८००० धावा पूर्ण करण्यासाठी सामन्याआधी ५३ धावांची गरज होती. त्याने या ८००० धावा भारताच्या दुसऱ्या डावात ३० धावा करताच पूर्ण केल्या.
तसेच त्याने कसोटी क्रिकेटमध्ये २००० धावांचा टप्पा पार केला. या सामन्याआधी त्याला कसोटी क्रिकेटमध्ये २००० धावा पूर्ण करण्यासाठी ७६ धावांची गरज होती. त्याने पहिल्या डावात २३ धावा केल्या होत्या. तर दुसऱ्या डावात लक्षण संदकनला षटकार ठोकत ५३ धावांवर पोहोचताच त्याने कसोटीतील २००० धावांचाही टप्पा पूर्ण केला.
हे विक्रम शिखरने आपल्या घराच्या प्रेक्षकांसमोर आणि त्यातही वाढदिवसाच्या दिवशी केल्याने त्याच्यासाठी ते विशेष असतील. शिखरने या सामन्यात दुसऱ्या डावात ९१ चेंडूत ६७ धावांची अर्धशतकी खेळी केली. यात त्याने ५ चौकार आणि १ षटकार मारले आहेत.