भारतीय संघ जुलै महिन्यात श्रीलंका दौर्यावर जाणार आहे. बीसीसीआयने रविवारी याबाबत घोषणा केली. या दौऱ्यात मर्यादित षटकांचे सामने खेळवले जातील. ज्यामध्ये तीन वनडे सामन्यांची मालिका आणि तीन टी२० सामन्यांची मालिका यांचा समावेश असेल.
मात्र याच कालावधीत भारताचा कसोटी संघ इंग्लंडच्या दौर्यावर असेल. त्यामुळे विराट कोहली, रोहित शर्मा यासारख्या मुख्य खेळाडूंच्या अनुपस्थितीतच भारतीय संघ श्रीलंका दौर्यावर जाईल. अशा परिस्थितीत भारतीय संघाचे नेतृत्व कोणाकडे असणार, याविषयी चर्चा सुरू झाली आहे. भारताचा माजी खेळाडू दीप दासगुप्ताने नुकतेच याविषयी आपले मत मांडले.
अनुभवी खेळाडूंचा सुचवला पर्याय
दीप दासगुप्ताने श्रीलंका दौऱ्यावरील भारतीय संघाच्या कर्णधारपदासाठी अनुभवी खेळाडूंना आपली पसंती दिली आहे. त्याने शिखर धवन आणि भुवनेश्वर कुमार हे दोन खेळाडू कर्णधारपदाचे प्रबळ दावेदार असतील, असे मत मांडले आहे. स्पोर्ट्स टुडेशी बोलतांना त्याने हे वक्तव्य केले.
तो म्हणाला, “निश्चितच श्रीलंका दौर्यावर विराट कोहली, रोहित शर्मा आणि केएल राहुल हे खेळाडू उपलब्ध नसतील. अशावेळी शिखर धवन हा संघातील सगळ्यात अनुभवी खेळाडू असेल. त्यामुळे त्याच्याकडे नेतृत्व दिले जाऊ शकते. मात्र जर भुवनेश्वर कुमार फिट झाला तर तो देखील या दौर्यावर संघाचा भाग असेल. अशा परिस्थितीत त्याला देखील नेतृत्व देण्याचा विचार केला जाऊ शकतो.”.
श्रीलंका दौऱ्याला १३ जुलैपासून सुरुवात
भारतीय संघाच्या श्रीलंका दौर्यावर १३ जुलै रोजी वनडे मालिकेतील पहिला सामना खेळवला जाईल. त्यानंतर १६ आणि १९ जुलै रोजी वनडे मालिकेचे उर्वरित दोन सामने खेळवले जातील. वनडे मालिका संपल्यानंतर टी२० मालिकेची सुरुवात होईल. या मालिकेचा पहिला सामना २२ जुलै रोजी खेळवला जाईल. तर उर्वरित दोन सामने अनुक्रमे २४ आणि २७ जुलै रोजी खेळवले जातील. अशा प्रकारे तीन वनडे सामने आणि तीन टी२० सामने खेळवण्यात येतील.
महत्त्वाच्या बातम्या-
उर्वरित आयपीएल होणार इंग्लंडच्या खेळाडूंविना? हे आहे कारण