भारतीय संघासाठी केवळ एकच फॉरमॅट खेळूनही सलामीवीर शिखर धवनला कोणताही पश्चाताप नाही आणि त्यात त्याची सर्वोत्तम कामगिरी सुरू ठेवायची आहे. वरिष्ठ खेळाडूंच्या अनुपस्थितीत वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर वनडे फॉरमॅटमध्ये संघाचे नेतृत्व करणाऱ्या धवनने त्याच्या ३७व्या वाढदिवसापूर्वी स्वत:ला वचन दिले आहे की जोपर्यंत तो संघासाठी उपयुक्त आहे तोपर्यंत तो खेळणार आहे.
संघासाठी ओझे बनू नका
वेस्ट इंडिजमधील एकदिवसीय मालिकेत संघाचे यशस्वी नेतृत्व केल्यानंतर एका मुलाखतीत धवन म्हणाला की, “जोपर्यंत मी भारतासाठी खेळेन तोपर्यंत मी संघासाठी उपयुक्त ठरेन. मला संघावर भार टाकायला आवडणार नाही.” धवनने २०२०च्या सुरुवातीपासून वेस्ट इंडिज दौऱ्यापर्यंत भारतासाठी २२ एकदिवसीय सामन्यांमध्ये १० अर्धशतकांच्या मदतीने ९७५ धावा केल्या आणि हा आकडा भारतीय खेळाडूंमध्ये सर्वाधिक आहे.
जेव्हा धवनला या आकडेवारीबद्दल विचारण्यात आले तेव्हा तो म्हणाला की, “मी एक शांत आणि परिपक्व व्यक्ती आहे. ही कामगिरी माझा अनुभव प्रतिबिंबित करते. मला खेळाची खूप चांगली समज आहे आणि माझे तंत्र सुधारण्यासाठी मी खूप मेहनत घेतली आहे. स्वरूप समजून घेणे देखील खूप महत्वाचे आहे. मला एकदिवसीय फॉर्मेटच्या गरजा समजतात आणि त्यामुळे मला खूप मदत झाली आहे.”
एक फॉरमॅट खेळण्याचे फायदे
जेव्हा जगभरात टी-२० फॉरमॅटची लोकप्रियता खूप वाढली आहे आणि एकदिवसीय मालिकेचे आयोजन कमी झाले आहे. अशा परिस्थितीत फक्त एकाच फॉरमॅटमध्ये खेळण्याबाबत विचारले असता धवन म्हणाला की, “मी या गोष्टीबद्दल कधीही निराश झालो नाही. मी आंतरराष्ट्रीय स्तरावर फक्त एकाच फॉरमॅटमध्ये खेळतोय या गोष्टींचा विचार करायला मला आवडत नाही. मला चांगले वाटते की मला दोन-तीन महिन्यांत खेळायला मिळेल आणि त्यामुळे मला फ्रेश राहण्यास मदत होते.”
धवनने त्याच्याकडे जे नाही त्याबद्दल दु:ख व्यक्त करण्याऐवजी त्याच्याकडे असलेल्या गोष्टींची कदर करणे महत्त्वाचे आहे. तो म्हणाला की, “मला जे मिळते त्यात मी आनंदी आहे. भारतासाठी जर मी एका फॉरमॅटमध्ये खेळत असेल तर त्या फॉरमॅटमध्ये मी माझे सर्वस्व देण्याचा प्रयत्न करतो. मी सकारात्मक विचार करणारा व्यक्ती आहे. तुला माझ्यात कोणतीही नकारात्मकता दिसणार नाही.”
स्वतःला तंदुरुस्त कसे ठेवायचे
वयानुसार त्याचा फिटनेस चांगला होत असल्याचे धवनने सांगितले. तो म्हणाला की, “मी ३६ वर्षांचा आहे आणि पूर्वीपेक्षा खूपच फिट आहे. मी जीम, योगासने, शारीरिक कसरत करत स्वत:मध्ये सुधारणा केली आहे.”
दरम्यान, देशासाठी १५५ एकदिवसीय सामन्यांमध्ये जवळपास ६५०० धावा करणारा धवन आता झिम्बाब्वे दौऱ्यावर भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. या दौऱ्यात अनेक वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. शिवाय आगामी आशिया चषकासाठी शिखर धवनचा भारतीय संघात समावेश करण्यात आलेला नाही. मात्र, धवन भारताच्या वनडे संघात एक प्रमुख खेळाडूची भुमिका बजावत आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारतीय संघाने वेस्ट इंडिजला ३ वेळा ‘एवढ्या’ कमी धावसंख्येत रोखलंय, पाहा रेकॉर्ड
राज्य ज्यूदो स्पर्धा २०२२: विकास, संपदा, गौतमी, समीक्षा, अपूर्वा, साईप्रसाद यांनी पटकावले सुवर्ण